वाळू माफियांच्या नातेवाईकांवर पोलीसांची दहशत

वाळू चोरी प्रकरणी कारवाई करताना कोणतीही नियमबाह्य कारवाई केलेली नाही. आरोपी फरार असल्याने त्यांच्या कुटुंबिय तसेच नातेवाईकांकडे आम्ही चौकशी करीत आहोत. त्याकरिता त्यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.
– भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, दौंड

देऊळगाव राजे – शिरापूर वाळू चोरी प्रकरणातील आरोपींची धरपकड करण्याच्या नावाखाली दौंड पोलिसांनी आरोपींचे कुटुंबीय व नातलगांना पोलीस ठाण्यात आणून बसविल्यामुळे संबंधीत कुटूंबीय व नातलग दौंड पोलिसांच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. आरोपींना पकडण्याकरिता तसेच कडक कारवाई करण्याकरिता पोलीसांकडून होत असलेला हा प्रकार कायद्याबाहेरचा असल्याचे संबंधीतांचे म्हणणे आहे.

शिरापूर भिमानदीतून (दि.22) वाळू चोरी केल्याप्रकरणी शिरापुरचे तलाठी हरिश्‍चंद्र फरांदे यांनी 200 ब्रास वाळू अंदाजे किंमत 12 लाख रुपये वाळू चोरी केल्याप्रकरणी 12 जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आज चार दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु, आजपर्यंत एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. तसेच विशेष चर्चेसाठी आरोपींकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आज दुपारी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर फौजफाट्यासह दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास आरोपींची धरपकड करण्यासाठी शिरापूर येथे आले. पोलीस निरीक्षक निंबाळकर शिरापूरला येणार आहेत, याची खबर त्यांच्याच खात्यातील खबरींकडून दिली गेल्याने या प्रकरणातील संशयीत आरोपी आगोदरच पसार झाले होते. आपल्या हाती काही लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी एका आरोपीचा भाऊ जो मोलमजुरी करून उपजीविका करतो, त्यालाच पकडून दौंड पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर त्यांचा जबाब घेऊन संबंधितांना सोडून दिले.
शिरापूर येथील वाळू चोरी प्रकरणातील आरोपींना अटक होऊन गुन्ह्याचा योग्य तपास होऊन शासकीय मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या आरोपींना योग्य कायदेशीर शासन झालेच पाहिजे. त्याशिवाय वाळू चोरीही थांबणार नाही. तलाठ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींना अटक करणे, चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे व मुद्देमालासह आरोपी कोर्टात हजर करणे हेच पोलिसांचे काम आहे. परंतु, आज नातलगांचीच धरपकड करण्याचा प्रकार दौंड पोलिसांनी केल्यामुळे आरोपींच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)