कासुर्डीत गावनेते पुढे असल्याची चर्चा : शासनाचा महसूल पाण्यात

यवत -दौंड तालुक्‍यातील कासुर्डी येथील ब्रिटिशकालीन तलावात राजरोजपणे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. येथे गाव नेतेच मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत असल्याची चर्चा होत आहे. यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल पाण्यात जात आहे.

कासुर्डी येथे अंदाजे शंभर एकर क्षेत्र असलेला ब्रिटिशकालीन मोठा तलाव आहे. तीन वर्षांपूर्वी येथील तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूमाफियांनी तलावातील वाळू, माती विकून लाखो रुपये कमावले होते. येथे अनधिकृतपणे महसूल विभागाच्या आशीर्वादाने बेसुमार वाळू उपसा सुरू केल्याचे बोलले जात आहे. हा वाळू उपसा गेली पाच महिन्यांपासून जोरात सुरू आहे. यापूर्वी दिवसा वाळू उपसा होत होता. परंतु एक ते दीड महिन्यांपूर्वी दौड -पुरंदरचे प्रांत यांनी येथे छापा टाकून मशनरी आणि वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करून त्यांचेवर कारवाई केली होती. आता मात्र वाळूमाफियांनी रात्रीचा वाळू उपसा सुरू केला आहे. येथे रात्रीचे वेळी पाच ते दहा जेसीबी मशीन, पाच पोकलेन मशीन, वाळू उपसा करीत असून पंधरा ते वीस ट्रक, मोठे हायवा डपंर याद्वारे शेकडो ब्रास वाळू उपसा होत आहे.

या वाळूद्वारे मात्र, वाळूमाफीया मालामाल होत आहेत. गेले पाच महिन्यापासून येथे वाळू उपसा चालू असून महसूल विभाग मात्र अनभिज्ञ आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या वाळूमाफियांवर कारवाई करून या तलावाचे रक्षण करावे, असे येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)