वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्याचे आदेश 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी : नामचीन गुंडांवर होणार कोम्बिंग ऑपरेशन
नगर – वाढत्या वाळूतस्करीवर पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यातील वाळूतस्करांवर मोक्का, एमपीडीएसारख्या कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत, तसेच अशा गुन्ह्यात वारंवार सहभागी असणाऱ्यांवर तडीपारीसारख्या कारवाया करण्यात येतील. वाळूतस्करीच्या घटनांत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करताना विलंब होणार नाही, याची दक्षता पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी. अवैध वाळूतस्कर असलेले नामचीन गुंड यांच्यावर कोम्बिंग ऑपरेशन करावे. सर्व विभागाच्या एकत्रित यंत्रणांच्या प्रयत्न करून, वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.
जिल्ह्याधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आज ऍक्‍शन प्लॅन ठरविण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, मुख्य सरकारी वकील सतीश पाटील, मुख्य शासकीय संचालक विधी आनंद नरखेडकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना जिल्हाधिकारी यांनी वाळूतस्करीसंदर्भात ऍक्‍शन प्लॅन ठरविण्यासाठी महसूल, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या प्रमुख यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलण्याचे सूतोवाच केले होते. यावेळी सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाळूतस्करी संदर्भातील सर्व बारीक-सारीक घटनांच्या संदर्भात महसूल, पोलीस यंत्रणांकडून हकीकत ऐकून घेतली. या बैठकीमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी आरटीओ विभागाच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एरवी इतर वाहने पकडून कारवाई करणाऱ्या या विभागात रात्रीच्या वेळी बिगर नंबर प्लेट असलेल्या गाड्यातून होणारी वाळू वाहतूक दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महसूल पथकांनी वाळूतस्करांची पकडून आणलेली वाहने चोरीला जातात. वाळूतस्करी संदर्भातील गुन्हे नोंदविण्यास विलंब केला जातो. अशा तक्रारी या बैठकीत पुढे आल्या. या बैठकीत महसूल कर्मचारी संघटनेचे भाऊसाहेब डमाळे, तलाठी संघटनेचे भुजबळ तसेच तहसीलदार सुधीर पाटील, अनिल दौंडे, सुभाष दळवी, भारती सागरे, महेंद्र माळी, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, अर्चना नष्टे, तेजस चव्हाण, उज्ज्वला गाडेकर यांनी वाळूतस्करी संदर्भातील घटनांचा पाढा वाचत अडचणी सांगितल्या.

पथके नेमून घालणार संयुक्त धाडी
पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, वाढत्या वाळूतस्करांना सर्व विभागाच्या एकत्रित यंत्रणांकडून लगाम लावला जाईल. जिह्यातील बेकायदेशीरपणे होणाऱ्या वाळू उपसा करणाऱ्या वाळूतस्करांना टार्गेट केले जाऊन, त्या ठिकाणी छापे टाकले जातील. अनेक ठिकाणी होणाऱ्या वाळूउपशाला स्थानिक परिसरातील गुंडांकडून वाळू उत्खननास पाठबळ मिळते, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना महसूल व यंत्रणांचे पथके नेमून संयुक्‍त धाडी घातल्या जातील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
वाळूतस्करांकडून सरकारी कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वीच राहुरी तालुक्‍यातील चिखलठाण येथील मुळा नदीपात्रात हल्ला झाला होता. त्यात पोलीस कर्मचारी, तहसीलदार जखमी झाले होते. या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना नुकतेच महसूल अधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते. नव्याने झालेल्या सुधारित कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)