वाळूची 47 वाहने पकडूनही ठेका अजूनही सुरू

म्हसवडमधील मातीमिश्रीत वाळूच्या गौडबंगालाची चौकशी करण्याची मागणी

दहिवडी, दि. 20 (प्रतिनिध) – म्हसवडमधील मातीमिश्रीत वाळूचे ठेके महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांना दिले गेले होते. मात्र, त्याठिकाणी चार वाहने भरण्याची परवानगी असताना शेकडो वाहनांनी वाळूचा बेसुमार उपसा करण्यात आला. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी 47 वाहने पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला असला तरी ही वाहने दुसऱ्याच दिवशी कशी सुटली, त्याचे पंचनामे कुठे गेले आणि हा ठेका अजूनही सुरू कसा असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

म्हसवडजवळ माण नदीपात्रात शेतकऱ्यांना मातीमिश्रीत वाळूचे काढण्यासाठी चार वाहनांना परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात आले आहे. तहसिलदार, सर्कल, तलाठी यांनी रोज त्याठिकाणी भेट देऊन देखील महसूल विभागाच्या हा प्रकार लक्षात आला नाही.

तहसिल व प्रांताधिकारी यांनी याठिकाणी 7 जून रोजी 47 वाहने पकडली व पंचनामे केले होते. तरीही ही वाहने दुसऱ्या दिवशी सुटली कशी गेली? त्याचे पंचनामे गेले कुठे? तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने सापडली तरी मातीमिश्रीत वाळूचा ठेका अजूनही सुरू कसा ठेवण्यात आला, हे नक्की गौडबंगाल कोणच्या सांगण्यावरून केले याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

मातीमिश्रत वाळूचे लिलाव निघाल्या नंतरच्या म्हसवडचे सर्कल तीन वेळा बदलले गेले कसे? तलाठी यु. एन अखडमल यांची बदली 31 मे रोजी वडूज तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आली होती. त्या आधीची नियुक्ती वावरहिरे येथे होती. तरीही ते म्हसवडमध्ये वाळूची वाहने पकडून कारवाई करणे, रजिस्टर चेक अशी काम पाहत होते. हजारो ब्रास वाळू चोरीला गेली तरी देखील त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचे अहवाल व पंचनामे का दिली नाहीत? बिगरपावती व पावतीची मॅजिक पेनच्या साहाय्याने खाडाखोड करून वाहतूक करताना बाहेर वाहने पकडून कारवाई झाल्या. मात्र, तहसीलदार, सर्कल, तलाठी गप्प कसे होते.? याची चौकशी होणार का.? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)