वाळवणीचे पदार्थ बणवण्यासाठी महिलांची लगबग

ग्रामीण भागातील महिलांचा एकमेका सहाय्य करू च्या भावनेतून विविध पदार्थ तयार करण्याकडे कल.
खेड – उन्हाळा संपण्यापूर्वी वाळवणीचे पदार्थ तयार करुन घेण्याची महिलांची सध्या लगबग सुरु आहे. शहरी भागात रेडीमेड पदार्थांची खरेदी करण्याचा कल आहे. मात्र ग्रामीण भागातील महिलांमध्ये एकमेका सहाय्य करू या भावनेतून एकत्र येऊन विविध पदार्थ तयार करण्याकडे कल दिसून येत आहे. कुरडया, पापड, सांडगे, शेवया, वेफर्स, चकल्या आदींच्या तयारीत सध्या महिला गुंतल्याचे चित्र आहे.
उन्हाळा तापायला लागल्याने घरा-घरात पापड, कुरडया, शेवाळ्या, वेफर्स, चकल्या, वडे आदी खाद्य साहित्यांचा वार्षिकसाठा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकटया व्यक्तीला या वस्तू तयार करण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे गल्ली तसेच वाड्यावस्त्यांवर महिला एकत्र येऊन टप्याटप्याने हे काम आटोपते घेत आहेत.
कुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड, शेवया, लोणची, मुरंबे, आदी पदार्थाच्या किमतीत ते टक्‍यांनी वाढ झाली असली तरी बाजारात या पदार्थाना प्रचंड मागणी आहे. उन्हाळ्याच्या मोसमात हे पदार्थ तयार करण्याकरता महिलांची लगबग सुरू होते.टप्प्याटप्प्याने हे पदार्थ तयार करुन उन्हात वाळवणीसाठी ठेवले जातात. अनेकांच्या घरात रोजच्या जेवणात असणारा हमखास पदार्थ म्हणजे पापड. त्यामुळे पापड तयार करण्यासाठी महिलांचे प्राधान्य असते.
नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना हे पदार्थ घरी बनवणे शक्‍य नसते. त्यामुळे घरगुती चव देणा-या लघुउद्योजकांकडून, बचतगटांकडून कुरडया, पापड, चकल्या, शेवया, वेफर्स, वडे आदी वस्तू विकत घेतल्या जातात. लघुउद्योग व बचतगटांतील महिला बाराही महिने यासाठी काम करत असल्याने विविध क्षेत्रांप्रमाणे लघुउद्योग आणि बचतगटांवरी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे हे पदार्थ तयार करण्यासाठी विविध यंत्रांचाही वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी हे पदार्थ तयार करण्यासाठी सर्व साहित्य दिले जाते. तसेच मजुरीचा खर्चही दिला जातो. अनेकांनी हे व्यवसायही सुरु केलेले आहेत.

शहरात रेडीमेड खरेदीचा कल
महिलांच्या सामाजिक सांस्कृतिक व्हाटसऍप गृपवर शहरातील महिलांचा याबाबत कल घेण्यात आला. यातुन बदलत्या संस्कृतीचा परिणाम म्हणून शहरातील महिला उन्हाळी कामे स्वतः करीत नसल्याचे समोर आले. रेडीमेड पदार्थांच्या खरेदीकडे त्यांचा ओढा आहे. शहरात आकर्षक स्वरूपात उपलब्ध होणारे पदार्थ, कामाचा कंटाळा, वाळण घालण्यासाठी जागेचा अभाव, कमी प्रमाणात पदार्थ केल्याने येणारा वाढीव खर्च, नोकरीमुळे वेळेचा अभाव अशी विविध कारणे या चर्चेतून समोर आली. यामध्ये वनिता जगताप, जयश्री ताबे, ज्योती वाबळे, संघमित्रा पवार, दिपा वानखेडे, महानंदा जाधव, सुनिता गाजरे आदी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिलांनी विचार मांडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)