वारी चुकलेल्या भाविकांना नगरमध्येच विठ्ठल दर्शन घडणार  

वर्धमान तरूण मंडळ : गणेशउत्सवात पंढरपूरच्या मंदिराची उभारणी.
नगर – वर्धमान तरुण मंडळाने तयार देखावे बाहेरून न मागवता, यंदाही स्थानिक कलाकारांना संधी देऊन नगरमधीलच लोकांना रोजगार मिळावा या हेतूने गणेशोत्सवात पंढरपूरच्या मंदिराच्या देखाव्याच्या उभारणीचे काम सुरु केले आहे.

प्रत्यक्ष पंढरपूरच्या मंदिर व विठ्ठल गाभाऱ्याचा अनुभव देण्याऱ्या देखाव्याचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. मंडळाचे किरण शिंगी यांच्या संकल्पनेतून हा भव्य देखावा तयार करण्याचे काम नगरचे कलाकार मोहन गुंडू व सहकारी गेल्या 20 दिवसापासून करत आहेत. विठ्ठलाची आकर्षक व सुंदर मूर्ती मोहन गुंडू यांनी तयार केली आहे.
पंढरपूरच्या येथील मंदिर, कळस, गाभारा अगदी हुबेहूब बनविण्यात आला आहे. मंदिराची रुंदी 90 फूट असून कळसासह उंची 35 फूट असणार आहे. 15 ते 20 कारागीर मोठ्या जोमाने काम करत असून भाविकांना नगरमध्येच विठ्ठल दर्शन घडणार आहे. यंदा जिल्ह्यातील भाविक हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चंगेडे यांनी व्यक्‍त केला.

हा देखावा भाविकांना गणेशोत्सवात वारी व दिंडीच्या आठवणी जागृत करणारा, वेगळा आनंद देणारा ठरेल तसेच जिल्ह्यात गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण असेल. मंडळाने यापूर्वी देखाव्यांची विविध पारितोषिके प्राप्त केली असून यंदाही या देखाव्यास हमखास पारितोषिक मिळणार अशी खात्री सर्व पदाधिकाऱ्यांना आहे. या देखाव्यासाठी व गणेश उत्सवासाठी प्रवीण कोठारी, अतुल भंडारी, बबन चंगेडे मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी मोठ्या उमेदीने कार्यरत असून, लवकरच हा देखावा भाविकांसाठी उपलब्ध होईल, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)