वारस कर्मचारी नेमणूकीचा प्रस्ताव संचालकांना पाठविण्यात येणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
सातारा, दि.11( प्रतिनिधी) – सातारा पालिकेतील वारस हक्क कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालक,वरळी यांना पाठविण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर मागील 10 दिवसापासून सुरू असलेले वारस हक्क कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सातारा पालिकेत मूळ वारसांना नियुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी 2 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. 9 दिवसात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी व नगरपालिका यांच्याकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता त्यामुळे बुधवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा कर्मचारी संघाने दिला होता. तसेच मंगळवारी सायंकाळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानुसार बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार, सातारा नगर पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे, आस्थापना प्रमुख अरविंद दामले आणि कर्मचारी संघाचे चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, सिद्धार्थ खरात, संदीप कांबळे व वारस कर्मचारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत दरम्यान मुख्याधिकारी शंकर गोरे यांना प्रतीक्षा यादी कोणत्या शासन निर्णयानुसार करण्यात आली याविषयी शासन संदर्भ सांगता आला नाही. तसेच सातारा नगरपालिकेत वारस नियुक्तीची झालेली अनियमितता ही मुख्याधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे झाली असल्याबाबत नगरपरिषद संचनालयाला माहिती देणे आणि वारस हक्क नियुक्ती नेमणुकीबाबत खुलासा मागणे आणि मूळ वारसांना नेमणूक देण्याबाबत प्रस्ताव पाठवून शिफारस मागण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत झालेल्या निर्णयाचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)