‘वारसदार ठरवून रक्ताचे नाते तोडण्याची घोषणा केली, अन्‌ मला खलनायक ठरवले’

पाथर्डी: लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाच्या कार्यक्रमात वारसदार ठरवून रक्ताचे नाते तोडण्याची घोषणा केली. अन्‌ मला खलनायक ठरवले गेले. नाते तोडण्याची भाषा त्यांनी केली असली तरी सततच्या संघर्षातुन मी गोपीनाथ मुंडे यांना जीवंत ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी परळी येथे झालेल्या स्व.मुंडेच्या जयंती कार्यक्रमात आई परळी व मावशी पाथर्डीचा किती विकास झाला. याचा पाढा वाचण्याऐवजी टिकेचे लक्ष मलाच केले गेले. त्यांच्या मावशीचा म्हणजे माझ्या आजीचा तालुका म्हणून पाथर्डी तालुक्‍याला कधीही अंतर देणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टिका केली.

तालुक्‍यातील चिचोंडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ना. मुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे, जि.प. सदस्य शिवाजी गाडे, गोविंद मोकाटे, कॉंग्रेसचे हिंगोली जिल्हा प्रभारी दादासाहेब मुंडे, जि.प.माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे, संदिप वर्पे, माजी जि.प. सदस्य मोहन पालवे, शिवशंकर राजळे, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, बाजार समीतीचे माजी सभापती गाहिनीनाथ शिरसाठ, राहुरीच्या सभापती मनिषा ओव्हळ, निर्मला मालपाणी, संजय कोळगे, रघुनाथ झिने उपस्थित होते.यावेळी माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ना. मुंडे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची निव्वळ फसवणूक केली. महागाई वाढली, बेकारांना नोकऱ्या नाही. आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला झुलवत ठेवले. अच्छे दिनच्या नावाखाली तरुणाईला वेड करून अक्षरशः नाचायला लावले. जनतेने सरकारला जागा दाखवण्याचे ठरवून पाच राज्यांमध्ये सत्ता उलथून टाकली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असुन जनतेतील नाराजीची लाट सरकारला घरी बसल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही. सपनोका सौदागर म्हणून स्वतःची प्रतिमा मोदींनी देशाला दाखवली. ती प्रतिमा तरुणाईकडून धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. धुळे व नगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी करण्यास माणसे मिळाली नाही. म्हणून अन्य पक्षातील उमेदवारांना पाळण्यात बसविले. तुमच्या घरात पाळणा हालत नाही तर शेजारच्या घरातील पोरांना पाळण्यात बसून बार्से साजरे करण्याचा प्रयत्न लोकांच्या लक्षात आला आहे, असा आरोप ना. मुंडे यांनी केला आहे.

जी लाट पूर्वी होती ती आता कोठेही अस्तित्वात नाही. अनेकांना मोठ्या फरकाने पराभव पहावा लागला. फसवणाऱ्या सरकारला घरी बसवल्याशिवाय माझी जबाबदारी पूर्ण होणार नाही. हरहर मोदी घरघर मोदीला सुद्धा आता घर घर लागली आहे. आगामी काळात परळीवाले येतील, रडतील, पडतील, बाबांच्या आठवणीने अश्रु ढळतील पण आता आशा गोष्टीला जनता फसणार नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कार्य आपण करीत आहोत.

ढाकणे म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा खराखुरा वारसदार म्हणून संपूर्ण राज्य धनंजय मुंडे यांच्याकडे पाहते. त्यांना राज्यात ताकद देणे काळाची गरज आहे. भावना व व्यवहार वेगळा असून कुणी मूर्ख बनवत असेल तर वेळीच ओळखा. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत लवकर भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेवून आगामी दिशा ठरवली जाईल. यावेळी तनपुरे म्हणाले. संपूर्ण राज्य संकटात असताना मराठा आरक्षणाचे पितापुत्रांचे फलक संतापजनक वाटतात. जणूकाही तुम्हीच आरक्षण मंजूर केले असे भासवून आणखी लोकांना फसवू नका. पाणी प्रश्‍नाकडे आमदारांची लक्ष नाही. दहा वर्षात कुठे थेंब पाणी आणले का याचा विचार लोकांनी करावा. संभाजीराव पालवे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन तर भरत पालवे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)