“वायसीएम’ वर आयुक्‍तांची “धाड’

सद्यस्थितीचा आढावा : संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक भेट दिली. आयुक्‍त हर्डिकर यांनी वायसीएम रुग्णालयात मंगळवारी प्रवेश करताच केस पेपर विभागातील व रुग्णालयातील रुग्णांच्या अडी-अडचणी व चाणक्‍य हॉलमध्ये वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयातील अन्य समस्यांची माहिती घेतली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. या वेळीही पूर्वीप्रमाणे मागण्यांचे गाऱ्हाणे आयुक्‍तांसमोर वैद्यकीय अधिक्षकांनी मांडले. परंतू उपलब्ध परिस्थितीत रुग्णांना चांगली सेवा देवून काम करण्याचा सल्ला आयुक्‍तांनी त्यांना दिला. महापालिका सभागृह नेता एकनाथ पवार, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्‍त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक मनोज देशमुख, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकर जाधव, डॉ. पद्याकर पंडित यावेळी उपस्थित होते.

संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डॉक्‍टरांसह चतुर्थ कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, देखभाल दुरुस्ती अभावी बंद यांत्रिक सामुग्री, वॉर्डातील अस्वच्छता, सुरक्षेअभावी रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्‍टरांना होणारी मारहाण, वैद्यकीय अधिक्षकांचे रुग्णालयावर नसलेले नियंत्रण, डॉक्‍टर, परिचारिकांचे कामाकडे दुर्लक्ष, स्वच्छता गृहाची दुर्गंधी, रुग्णांच्या वॉर्डातील ढेकणांचे वाढलेला त्रास आदीं समस्यांची माहिती घेतली.
वायसीएम रुग्णालयाच्या प्रस्तावित महाविद्यालयाचा आढावाही आयुक्‍तांनी घेतला. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक असिस्टंट प्राध्यापक व डॉक्‍टारांची संख्याही येथे अपुरी आहे. त्या जागा तातडीने भरून घेण्याची सूचना आयुक्‍तांनी दिली. तसेच इंडियन मेडिकल कौन्सीलचे पथक तपासणी करण्यासाठी येणार आहे. त्यांचे योग्य नियोजन करण्याची सूचनाही डॉक्‍टारांना यावेळी आयुक्‍त हर्डीकर यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधनावरील कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. मानधनावरील कर्मचाऱ्यांना मेडिकल व पगारी रजा मिळत नाही. तरीही त्याच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वायसीएम रुग्णालयाचा डोलारा तग धरून आहे. तसेच, मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा मिळत नाही. याबाबत कित्येक वर्षांपासून महापालिकेकडे “पीएफ’ व “ईएसआय’ ची मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. परंतु, तात्कालीन व विद्यमान सत्ताधारी याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)