‘वायसीएम’ची भरती प्रक्रिया रखडली

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) दर सहा महिन्याला कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जाते. नोव्हेंबर महिन्यामध्ये भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अद्यापपर्यत झाली नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण जाणवत आहे. यामुळे, निवड प्रक्रिया लवकर पूर्ण करून त्वरित रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे.

वायसीएम रुग्णालयातील विविध हंगामी पदांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असून तो नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस संपला. यासाठी, नवीन पदे भरण्यासाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विविध पदांसाठी लेखी परीक्षा व मुलाखती नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या होत्या. मात्र, त्यानंतर निवड प्रक्रिया संथगतीने सुरु असल्यामुळे कोणतीच रिक्त पदे भरली न गेल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. वायसीएम रुग्णालय 750 खाटांचे असून या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यासह आसपासच्या ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या ठिकाणी अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्री-रोग, दंतरोग असे आठ प्रकारचे विभाग आहेत. दररोज शेकडो बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचार घेत असतात. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे येणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय होत आहे. सहा रुग्णांसाठी एक परिचारिका असणे आवश्‍यक आहे. मात्र, वायसीएममध्ये रुग्णांसाठी एक परिचारिका आहे. त्यामुळे रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष देता येत नसल्याचे, परिचारिकांनी सांगितले. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवतात.

रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रुग्णांना वेळेवर औषधांचे डोस दिले जात नाही. परिचारिकांची संख्या कमी असल्याने सकाळची औषधे देण्यासाठी सुरूवात केल्यानंतर शेवटच्या रुग्णापर्यंत दुपारचा सुमार होत आहे. त्यामुळे, रुग्णांच्या पुढील औषधे व इंजेक्‍शनच्या वेळा चुकत असल्याने त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)