वाद मिटवून पती-पत्नीला एकत्र आणण्याचे काम कौटुंबिक न्यायालयात झाले पाहिजे -देवेंद्र फडणवीस

 

कौटुंबिक न्यायालयाच्या मालकीच्या असलेल्या राज्यातील पहिल्या इमारतीचे उदघाटन
पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) – अलीकडच्या काळात पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत आहे. समाजात विभक्त कुटुंब पध्दत रुढ झाल्यामुळे पती-पत्नींचे समुपदेशन होत नाही. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात वाद दाखल झाल्यानंतर त्या दोघांना एकत्रित आणण्यचे काम केले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाटाच्या प्रवेशद्वारासमोरील कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयच्या न्यायाधीश रेवती मोहिते – डेरे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक , पालकमंत्री गिरीष बापट, कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश शैलजा सावंत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे गणेश कवडे, आमदार विजय काळे, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते.

कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या मागील काही वर्षात वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. विभक्त होण्याचा निर्णय जड अंतकरणाने घेतला जातो. या निर्णयामुळे मुलेही पालकापासून दुरावतात. कुटुंब अस्थिर होते. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण कमी व्हावे. दाखल झालेल्या दाव्यांचा तातडीने निपटारा व्हारा, अशी इच्छा व्यक्त करून फडणवीस म्हणाले, राज्यातील न्यायालयात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने दुप्पट निधीची तरतुद केली आहे. नवीन कौटुंबिक न्यायालयात देण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या न्यायालयात येणारे पक्षकार कुटुंब कलहामुळे निराश असतात. अशा पक्षकारांना येथे देखील अडचणीला सामोरे जावे लागू नये. यासाठी देण्यात आलेल्या सुविधा समाधानकारक आहेत. सुविधा चांगल्या असतील तर तेथील काम करणाऱ्यांची क्षमता वाढते. या न्यायालयात येणारे पक्षकार हे निराश झालेले असतात. या न्यायालयात कुटुंब एकत्र आणण्याचे काम झाले पाहीजे, असेही ते म्हणाले.
पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात गेल्यानंतर सर्व प्रश्‍न सुटतात, असा विश्‍वास निर्माण करण्याचे आवाहन करत
न्यायमुर्ती चेल्लूर म्हणाल्या, कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज, वातावरण हे इतर न्यायालयापेक्षा अतिशय वेगळे असते. वाद झाल्यानंतर पती-पत्नीला पुन्हा एकत्र आणण्याचे पवित्र कार्य कौटुंबिक न्यायालय करत असते. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले असेल तर तुम्ही कोणत्याही पेशात असला तर काहीच करू शकत नाही. कौटुंबिक स्वास्थ बिघडल्यानंतर पक्षकार आनंद, सुरक्षितता, शांती मिळविण्यासाठी येथे येत असतो. मुलांना आई आणि वडील या दोघांची गरज असते. आई वडीलांचे भांडण त्याला पहावे लागणे दुर्दैवी आहे. अशी प्रकरणे वकील, समुपदेशकांनी योग्य रितीने हाताळली पाहीजे.
शैलजा सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भूषण गवई, रेवती मोहिती – डेरे, श्रीराम मोडक, ऍड. राजेंद्र दौंडकर आणि ऍड. गणेश कवडे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. जिल्ह्यातील तालुका न्यायालयातील इमारतीचे नूतनीकरण करण्याची मागणी ऍड. दौंडकर यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)