वाद अखेर शमला; बॉक्‍स कमानींना परवानगी

साडेपाच फुटांपर्यंत उभारता येणार : महापालिका भवनात झालेल्या बैठकीत निर्णय

पुणे – गणेशोत्सवात उभारण्यात येणाऱ्या बॉक्‍स कमानींवरील वाद अखेर शमला असून, साडेपाच फूट उंचीवर बॉक्‍स कमानी उभारण्याला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. या विषयात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मध्यस्थी केली असून, त्यांच्या उपस्थितीत बुधवारी महापालिका भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

एका मंडळाने किती कमानी उभाराव्यात याबाबत ठोस निर्णय न झाल्याने याबाबत मात्र संभ्रम अद्याप कायम आहे. तसेच, साऊंड सिस्टीमच्या भिंती (डॉल्बी) आणि दारुबंदी याबाबत मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे पालकमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. डॉल्बी व दारुमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव, अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.

न्यायालयात जाणाऱ्या एक-दोन व्यक्तींमुळे चाळीस पन्नास लाखांच्या लोकसंख्येला वेठीस धरणे योग्य नाही. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी मंडळांकडून घेतली जाते. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना पळापळ करायला लावू नये. अहवालातील जाहिरात आणि कमानींवरील जाहिरात हे गणेश मंडळांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत, असे बापट म्हणाले.

पोलिसांच्या सुरक्षेचा आम्ही आदर करतो, पोलीस आक्षेप घेतील तेथे कमानी उभा केल्या जाणार नाहीत. मात्र, उत्पन्नाचे साधन कमी करू नये. माणसाच्या उंचीपेक्षा थोडे जास्त उंचीवर कमानी उभारू, सीसीटीव्ही, कार्यकर्ते यांची व्यवस्था करून दिवसातून दोनवेळा कार्यकर्ते कमानीची तपासणी करतील, अशी ग्वाही बापट यांनी या बैठकीत मंडळांच्या वतीने दिली. तसेच, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घालू नये, त्यांना सहकार्य करावे, पोलीस जे सांगतील ते ऐकणे आपले कर्तव्य आहे, असेही सांगितले.

साऊंड सिस्टीमचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे साऊंड सिस्टिम आणि दारुबंदी उठवण्याबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नाही. पोलिसांनी याबाबत बिनधास्त कारवाई करावी, आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. जे करतील त्यांची नावे पोलिसांनी जाहीर करावीत. मंडळांनीही साऊण्डच्या भिंती आणि दारू या दोन गोष्टी उत्सवापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

कमानींच्या संख्येबाबत संभ्रम
पालकमंत्री बापट आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी लावून धरल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी साडेपाच फूट उंचीवरून बॉक्‍स कमानी उभारण्यास सहमती दर्शविली. यावेळी एका मंडळाने किती कमानी उभाराव्यात यासंबंधीची संख्या निश्‍चित करण्याची सूचना वाहतूक शाखेच्या तेजस्वी सातपुते यांनी केली. तेव्हा मागील वर्षी जेवढ्या कमानी उभारल्या होत्या, तेवढ्याच संख्येला परवानगी देण्याची मागणी मंडळांनी केली. तर, पालकमंत्र्यांनी उत्पन्नाच्या साधनांमुळे जास्तीत जास्त कमानींना परवानगी देण्याची सूचना केली. या सर्व गोंधळात कमानींच्या संख्येबाबत ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे कमानींच्या संख्येबाबत संभ्रम कायम आहे.

गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मागण्या
शंभर सव्वाशे वर्षांची मंडळे आहेत, त्यामुळे त्यांना मागील कागदपत्रांच्या आधारे एका आर्जावर परवानगी देण्यात यावी, मागील परवाने कायम करावेत, बैठका तीन महिने आधी घेतल्या जाव्यात, मंडळांचे उत्पन्न कमानींवरील जाहिरातींवर अवलंबून असल्याने बॉक्‍स कमानींना परवानगी द्या, कमानींची संख्या मागील वर्षी जेवढी होती तेवढीच ठेवावी, अशा मागण्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत केल्या.

न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तक्रार नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी मंडळांनी घ्यावी. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

– सौरभ राव, आयुक्त, महापालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)