वादाचे “पाणी’ बैठकांच्या वळणावर!

पुणेकरांचे लक्ष : मुख्यमंत्री सोमवारी मुंबईत घेणार बैठक


पाणीकोटा 16 टीएमसी करण्याबाबत चर्चा : महापौर

पुणे – शहराच्या पाण्यावरून पाटबंधारे विभाग महापालिकेस वारंवार वेठीस धरत आहे. त्यामुळे पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि. 26) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. शहराला एकवेळ, पण नियोजित पुरवठ्यासाठी आवश्‍यक असलेल्या 1,350 “एमएलडी’ पाण्यासह, महापालिकेचा पाणीकोटा 16 टीएमसी करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे महापौर म्हणाल्या.

यंदा परतीच्या मान्सूनने दगा दिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. त्यामुळे कालवा समिती बैठकीत महापालिकेस 11.50 टीएमसी पाणी प्रत्येक वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार, 15 जुलै 2019पर्यंत हे पाणी वापरण्यासाठी महापालिकेने दररोज फक्‍त 900 “एमएलडी’ पाणी घेणे अपेक्षित आहे. मात्र, शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने महापालिकेस 1,150 “एमएलडी’ प्रतिदिन हा नियंत्रित पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. पण, त्यापेक्षा जादा पाणी घेत जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही पालिकेने काहीच नियोजन केले नाही. दरम्यान, ऑक्‍टोबर-2018 मध्ये महापालिकेने सरासरी 1,355 एमएलडी पाणी दररोज उचलल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला. त्यानंतर लगेच थकबाकीची मागणीही करण्यात आली. ती भरली नाही, म्हणून गुरूवारी दुपारी पालिकेच्या पाणी पुरवठ्याचे पंप पोलीस बंदोबस्तात बंद करण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे महापौरांसह आयुक्तदेखील रात्री उशिरापर्यंत जलसंपदा विभाग सचिवांसह, मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांनाही वारंवार पाणी सोडण्यासाठी विनंती करत होते. अखेर रात्री 10 वाजता हे पंप सुरू करण्यात आले.

कालवा समितीची पुन्हा बैठक?
पंप सुरू करण्यासाठी विनंती करतानाच महापौर आणि आयुक्तांनी या प्रश्‍नी तातडीने तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा कालवा समितीची बैठक बोलाविण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत येत्या सोमवारी पुण्याच्या पाणीप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी मुंबईत विधानभवनात बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीचा निरोप आयुक्तांसह महापौरांना शुक्रवारी सकाळी देण्यात आला. त्यानुसार, या बैठकीस महापौर, आयुक्त, पालकमंत्री, जलसंपदामंत्री तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह शहरातील आमदारही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

1,350 “एमएलडी’ची मागणी कायम
शहराला एकवेळ पाणी द्यायचे असले, तरी पुरेशा दाबाने आणि जादा वेळ देण्यासाठी महापालिकेस दररोज 1,350 “एमएलडी’ पाण्याची गरज आहे. मात्र, कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार पाटबंधारे विभाग 1,150 “एमएलडी’ इतकेच पाणी पालिकेस देण्यावर अडून बसला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत दोन्ही प्रशासनात वाद सुरू आहेत. याचा फटका पुणेकरांना बसत आहे. तर पाटबंधारे विभागाकडून दोन महिन्यांत दोन वेळा पोलीस बंदोबस्तात पालिकेचे पंप बंद करण्यात आल्याने हा वाद आणखी वाढला आहे. त्यामुळे या बैठकीत शहरासाठी दररोज 1,350 “एमएलडी’ पाणी मिळावे, अशी मुख्य मागणी राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)