वादग्रस्त ‘वेस्टू एनर्जी’वर आयुक्तांचा ‘मास्टर स्ट्रोक’

पिंपरी – मोशी कचरा डेपो येथे उभारण्यात येणारा प्रस्तावित “वेस्ट टू एजर्नी’ प्रकल्पावरुन पिंपरी-चिंचवड महापालिका महासभेत “आरोग्यदायी’ चर्चा झाली. प्रकल्पाच्या माहितीवरुन विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांनीही प्रशासनावर आक्षेप घेतले. अखेर महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे “गुरूजी’ आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्वत: प्रकल्प सादरीकरणाची भूमिका निभावली. त्यामुळे विरोधकांचा विरोध मावळला आणि शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला मंजुरी मिळाली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौन नितीन काळजे होते. मोशी कचरा डेपो येथील जागेवर उभारण्यात येणा-या प्रस्तावित “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी, शिवसेना या विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी नाराजीचा सूर धरला होता. मात्र, महापालिका प्रशासन आणि भाजपमधील वरिष्ठ पदाधिका-यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. सर्वसाधारण सभेत प्रकल्पाची माहिती प्रशासनाकडून सादर करण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

यानिमित्ताने झालेल्या चर्चेत आमदार महेश लांडगे समर्थक गटातील राहुल जाधव, विकास डोळस, सुवर्णा बुर्डे, सोनाली गव्हाणे, सारिका बोऱ्हाटे यांनी सहभाग घेतला. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते योगेश बहल आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यासह मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी प्रकल्पाला विरोध नाही…पण, प्रशासनाने सर्व पक्षीय नगरसेवकांना विश्‍वासात घ्यायला पाहिजे होते, अशी भूमिका मांडली.

प्रकल्पाबाबत विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांनी शंका उपस्थित केल्यामुळे अखेर महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करावे, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी दिली. त्यानंतर आयुक्‍तांनी “पीपीटी’ सभागृतच प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यामध्ये प्रकल्पाचे महत्त्व, उपायोगिता, जागा ताब्यात देण्याची प्रक्रिया, संबंधित ठेकेदाराशी केलेला करार, प्रकल्पाची कार्यवाही, जबाबदारीबाबतचा करार, वीज निर्मिती आणि विक्री आदी विविध प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे सादरीकरणाद्वारे सभागृहाला दिली. त्यामुळे सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने प्रकल्पाला मंजुरी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून सध्यस्थितीला मोशी कचरा डेपोवर प्रतिदिन सुमारे 750 ते 800 मेट्रिक टन कचरा येत आहे. कचरा डेपोसाठी सुमारे 81 एकर जागा 1991 पासून महापालिकेच्या ताब्यात आहे. त्याठिकाणी मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लॅंन्ट, गांडूळ खत प्रकल्प, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती असे प्रकल्प कार्यान्वयीत आहेत. तसेच, कचरा डेपोवर 20 ते 22 एकर जागेवर गेल्या 20 वर्षांपासून “ओपन डंम्पिंग’ केले जात आहे. तसेच, प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यासाठी सॅनिटरी लॅन्डफिल टप्पा 1 आणि 2 विकसित करण्यात आला आहे. सॅनिटरी लॅन्डफिल आणि इतर कच-यातून निर्माण होणा-या लिचेट’वर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक लिचेट ट्रिटमेंट प्लॅन्ट तयार केला आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणि नागरी आरोग्याच्या दृष्टीने आता मोशी येथील कचरा डेपोवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारण्याची गरज आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांनी “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबवण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.

महाराष्ट्रातील “रोल मॉडेल’ प्रकल्प…
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापना संदर्भात प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करुन महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे. या अहवालामध्ये वेस्ट टू एनर्जी’, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस, सी एंड डी वेस्ट, व अन्य आवश्‍यक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या प्रकल्प अहवालाची छाननी मे. नेरी, नागपूर येथील संस्थेकडून करण्यात आली आहे. तांत्रिक सल्लागार समितीने सूचवलेले बदल करून संबंधित प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्याद्वारे तीन ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. सर्वात कमी दर असलेल्या मे. अन्टोनी लारा एन्व्हायरो प्रा. लि. याची निविदा मंजूर करण्यात आली. शहरातील कचरा समस्येवर दीर्घकालिन उपाययोजना करण्यासाठी उभारण्यात येणारा “वेस्ट टू एनर्जी’ हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहेत. आगामी काळात कचरा समस्येबाबत बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारलेला हा प्रकल्प राज्यासाठी “रोल मॉडेल’ ठरणार आहे, अशी अपेक्षा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी व्यक्‍त केली.

सेना, राष्ट्रवादीसह स्वपक्षीय विरोधकांवर मात…
भोसरीचे आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना “भोसरी व्हीजन-2020′ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पच्या उभारणीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राजकीय श्रेयवादाच्या लढाईत शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिका-यांनी “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला विरोधत केला. तसेच, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील काही पदाधिका-यांनीही प्रकल्पला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनीही उघडपणे प्रकल्पला विरोध केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाबाबत सकारात्म भूमिका घेतली. तसेच, …हा प्रकल्प महेश लांडगेंचा नूसन, संपूर्ण शहराचा आहे. प्रकल्पाच्या श्रेयावरून राजकारण करू नये, असे ठणकावले होते. आज महापालिका सर्वसाधारण सभेत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने आमदार लांडगे यांनी एकाच वेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि स्वपक्षीय विरोधकांवर मात केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बहुप्रतिक्षीत “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला अखेर सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली आहे. आगामी 15 दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा ड्रिम प्रोजेक्‍ट’ असलेल्या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत होईल. पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प राज्यातील “रोल मॉडेल’ राहील.
– नितीन काळजे, महापौर, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)