वाढीव पाणी अजूनही रामभरोसेच!

पाणी प्रश्‍न मिटवल्याचे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांची स्वत:ला शाबासकी


पुणेकरांना पाणी कमी पडू न देण्याचा दावा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – “मुख्यमंत्र्यांशी बोलून आम्ही पाण्याचा प्रश्‍न मिटवला; आता पाणी कमी पडणार नाही,’ असे म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली खरी, परंतु या संदर्भात मुख्य सचिवांचे पत्रच जलसंपदा विभाग आणि महापालिकेला आले नसल्याने 1,350 एमएलडी पाणी मिळणे रामभरोसेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

1,350 एमएलडीपेक्षा एक थेंबही पाणी कमी करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे दौऱ्यावेळी केली होती. या प्रश्‍नांत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असेही सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य करून जलसंपदा विभागाला सांगितल्याचे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्याचे पदाधिकारी सांगत असले तरी शुक्रवारी 1150 एमएलडीच पाणी पाटबंधारे विभागाकडून सोडण्यात आले.

“आम्ही पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा केला आहे. पुण्याला पाणी वाढवून देण्याचा प्रश्‍न हा 2011 पासूनचा आहे. तो राज्यसरकारच्या अखत्यारित असलेल्या विभागाकडे आहे. त्यामुळे त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेच विनंती करावी लागणार होती, त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनाच विनंती केली,’ असे भिमाले यांनी सांगितले.

एकहाती सत्ता असूनही उपयोग नाही
शहराचे कारभारी म्हणून 100 नगरसेवकांसह एकहाती सत्ता महापालिकेत असूनही, तसेच पक्षाचे दोन खासदार आणि आठ आमदार असूनही “भाजपेयीं’ना शहराच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवता आला नाही. राज्यातही सत्ता आहेच, परंतु पालकमंत्री कालवा समितीला उपस्थित राहूनही ते आणि अन्य आमदार पुण्याच्या पाण्याबाबत बोलू शकले नाहीत. अखेर यामध्ये मुख्यमंत्र्यांनाच मध्यस्थी करावी लागली अशी नामुष्की भाजपेयींवर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरातील पदाधिकारी, नेते यांचे राज्यात काहीच वजन नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, एकहाती सत्ता असूनही काहीच उपयोग नाही, अशी स्थिती सत्ताधाऱ्यांची झाल्याचे पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)