वाढीव दराच्या निविदांमधून लूट

पिंपरी – महापालिकेत शहरातील रस्ते विकासकामात मूळ अंदाजित खर्चात वाढीव दराच्या नावाखाली पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) मार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये केवळ रस्त्यांचीच दुरवस्था असल्याचा आभास आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी जाणीवपूर्वक निर्माण केला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण आणि रस्ते विकास यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरात एक हजार 70 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील 874.14 किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम आणि वेगवान करण्याकरिता बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) विकसित करण्यात येत आहे. तरी, देखील आयुक्‍तांना “एकच ध्यास, रस्ते विकास’ हे पालुपद कायम ठेवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील रस्त्याच्या कामाच्या निविदा ठेकेदारांकडून वाढीव दराने भरल्या जात आहेत. आयुक्‍तदेखील त्यांना वाढीव दराची कंत्राटे बहाल करत आहेत. तसेच विविध विकासकामांच्या खर्चात वाढ होत आहे. वाढीव खर्चाचे विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येत आहेत. अशा पद्धतीने शहरातील रस्ते विकासकामात मूळ अंदाजित खर्चात वाढीव दराच्या नावाखाली पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)