वाढत्या वाहतुकीचा लोंढा थोपविणार कसा?

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चर्चेचा विषय बनत चालली आहे. कोंडीत अडकलेले नागरिक याचा पूर्ण दोष वाहतूक पोलिसांवर लादत आहेत. मात्र अरुंद रस्ते, दुबळी सार्वजनिक व्यवस्था आणि लोकसंख्येपेक्षाही जास्त म्हणजे तब्बल 40 लाख वाहनांची संख्या ही दुसरी बाजू बघितली जात नाही.

पुणे शहरात मागील पाच ते सात वर्षांत वाहतूक कोंडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ऐन “पिक अवर्स’ला वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात चिडचिड होताना दिसत आहे. वाहतूक कोंडीमुळे कार्यालय, महाविद्यालय आणि शाळेत वेळेवर पोहचू शकत नसल्याचा अनेकांना अनुभव आला आहे. पावसाळ्यात तर चारचाकी वाहनांचे रस्त्यावर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते. यातच रस्त्यावरील खड्डे आणि बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे काही रस्त्यांवर तासन्‌तास रांगा लागलेल्या दिसतात. यातच वाहतुकीचे नियम न पाळण्याची वाहनचालकांमध्ये स्पर्धाच लागलेली असते. यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडलेली दिसते.

या वाहतूक कोंडीचा सर्वस्वी वाहतूक पोलीसच जबाबदार असल्याचे वाहनचालक मानतात. जे वाहतूक पोलीस भर चौकात तासन तास कर्तव्य पार पाडत असताना त्यांना नागरिकांच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. मात्र, वाहतूक कोंडीमागील वस्तूस्थिी बघितली जात नाही. वाहनचालक स्वयंशिस्त व वाहतुकीचे नियम पाळत नाहीत.वाहतूक शाखेने सूचवलेले रस्त्यावरील बदल तसेच रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण हटवणे ही बाब गांभीर्याने महापालिका घेत नाही. या सर्व बाबी वाहतूक कोंडीस जबाबदार ठरत आहेत. याकडे मात्र सर्वसामान्य नागरिक दुर्लक्ष करताना दिसतो. पुणे शहरातील रस्ते हे पेशवेकालीन आहेत. येथून टांगा किंवा सायकल जाऊ शकेल, इतकीच त्यांची तेव्हा रुंदी होती. ही रुंदी शहरातील वाहनांची संख्या 40 लाख होऊनही खचितच वाढली गेली नाही. शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांची रुंदी ही वाहतूक कोंडी होण्यामागील सर्वात मोठी समस्या आहे. शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे. तसेच शाळा महाविद्यालये, सर्व महत्त्वाची कार्यालयेही येथेच आहेत. यामुळे चारही बाजूने वाहतुकींचा लोंढा येथे येत असतो. येथील रस्त्याची रुंदी वाढवणे अशक्‍य आहे. मात्र, येथील अतिक्रमणे, रस्त्यावरील पथारी वाले, अनधिकृत पार्किंग आदी समस्यांची मुळा पासून सोडवणूक केली तर वाहतूक थोडी फार सुसह्य होण्यास मदत होईल.

तोडगा निघणार का?
नवनिर्वाचित पोलीस आयुक्तांनीही शहरातील वाहतूक कोंडीची गांभीर्याने दखल घेतली आहे. सूत्रे स्वीकारताच त्यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येला हात घातला आहे. अभ्यासाअंती त्यांनाही ही समस्या फक्त वाहतूक नियोजन करुन सुटणार नसल्याचे लक्षात आले आहे. यामुळेच त्यांनीही नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले आहेत. तसेच महापालिकेसोबत सातत्याने बैठका घेऊन रस्ता रुंदीकरण, अपघाताच्या ठिकाणांची दुरुस्ती आदीबाबात पुढाकार घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)