वाढत्या गुन्ह्यांची दखल पोलीस घेतील का?

– संजय कडू

पुणे – शहरात भर रस्त्यात होणाऱ्या लूटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ऐन वर्दळीच्या ठिकाणी एखाद्याला हत्यार दाखवून तसेच मारहाण करुन लुटले जात आहे. खिशातील काही शे-पाचशे रुपये तसेच मोबाइलसाठी ही लुटमार केली जात आहे. इतकेच नव्हे, तर पीडिताला अनेकदा मारहाण करण्याबरोबरच हत्याराने वारही केले जात आहेत. यामध्ये कोयता, लोखंडी रॉड, चाकू किंवा अगदी कटरचाही सर्रास वापर केला जात आहे. तर दुसरीकडे दुकानदार किंवा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडे खंडणी स्वरुपात रक्‍कम मागण्याच्या, वाहने जाळपोळीच्या आणि हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवण्याच्या घटनाही दखल घेण्याजोग्या वाढल्या आहेत.

शहरातील मोठ्या टोळ्यांतील गुंड “मोक्‍का’अंतर्गत कारागृहात असताना संघटीत गुन्हेगारीतून होणारी टोळीयुद्ध शमली आहेत. यामुळे काही काळ पुणेकरांनी मोकळा श्‍वास घेतला होता. मात्र, मागील काही महिन्यांत रस्त्यावरील गुन्हेगारीने, परिसरातील तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना वाढल्याने पुणेकर पुन्हा एकदा दहशतीच्या वातारवणात आहेत. ही दहशत मध्यवर्ती परिसराबरोबरच उपनगरांमध्येही आहे. दहशत माजवणाऱ्यांना खाकी वर्दीची कोणतीच भीती नसल्याचे दिसते. त्यांना जरब बसावी, असे कोणतेही प्रयत्न पोलिसांकडून होत नाहीत. मात्र, हिंदी चित्रपटाप्रमाणे घटना घडून गेल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल होत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहेत. मुंबईतील गुन्हेगारीप्रमाणे कोणतेही मोठी आव्हान सामोरे नसताना रस्त्यावरील गुन्हेगारी व किरकोळ कारणावरुन पसरवल्या जाणाऱ्या दहशतीचे प्रकारही रोखण्यास पुणे पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.

पुणे शहरातील गुन्हेगारीचा विचार करता मुंबई प्रमाणे येथेही काही टोळ्या कार्यरत होत्या. या टोळ्यांतील वैमनस्यातून अनेक खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. या टोळ्यांचा खंडणी मागणे, लॉटरी, जुगार अड्डे , व्हिडीओ पार्लर अशा मार्गातून कमाई करायच्या यानंतर शहराचा जस जसा विकास होत गेला तसतशी जमिनीला मोठी किंमत मिळू लागली. यानंतर बहुतांश टोळ्या जमिनीच्या व्यवहारात मध्यस्थी किंवा जमिनी लाटण्याच्या मागे लागल्या. प्रत्येक टोळीची काही ठराविक भागात दहशत होती. मात्र मागील काही वर्षांत जवळपास सर्वच संघटीत टोळ्यांना मोक्‍का लावला गेल्याने टोळीप्रमुख आणि त्यांचे चेले कारागृहात खितपत पडले आहेत. यामध्ये सोनसाखळी चोरांच्या टोळीबरोबच हाय प्रोफाइल वेश्‍या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्यांनाही मोक्‍का लावला गेला आहे. यामुळे शहर संघटीत गुन्हेगारीतून होणारे गुन्ह्यांचे सत्र पूर्णत: थांबले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरील लुटमारीच्या घटनांनी उचल खाल्ली आहे. कोणत्याही मोठ्या संघटीत टोळ्या कार्यरत नसताना, गल्ली-बोळातील अगदी सोळा ते पंचवीस वर्ष वयोगटातील दहा बारा टाळकी एकत्र येत ठिकठिकाणी हत्यारे हवेत फिरवत दहशत माजवताना दिसत आहेत. शहरातील प्रत्येक उपनगरात हे चित्र सध्या नेहमीचेच झाले आहे. अगदी धक्का लागला, रागाने बघितले, गाडीला ओव्हरटेक केले अशा क्षुल्लक कारणावरुन दाट वस्तीच्या परिसरात दहशत माजवली जात आहे. यामध्ये विनाकारण सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड आणी जाळपोळ केली जात आहे. तसेच घरांवर दगडफेकही केली जात आहे.

पोलिसांची जरब आणि उपस्थितीचा अभाव
नव्याने गुन्हेगारीत शिरकाव करणाऱ्यांवर पोलिसांची कोणतीही जरब नाही. ते खाकी वर्दीला घाबरत नाहीत. स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची गस्तही अशा परिसरांमध्ये वाढवली नाही. पोलीस ठाण्याच्या पातळीवर अशा गुन्हेगारीला आवर घालणे शक्‍य आहे. मात्र वरिष्ठांकडून अशा घटनांकडे गुन्हा नोंदवणे व आरोपींना पकडणे यापलिकडे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून मनापासून प्रयत्न होताना दिसत नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)