वाढती बेशिस्त, घटती कारवाई

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कारवाई कमी


वाहतूक पोलीस, आरटीओकडून दुर्लक्ष्य

पुणे – सिग्नल तोडणे, रॅश ड्रायव्हिंग तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर केलेल्या लायसन्स निलंबन कारवाईचा आकडा गतवर्षी साडेतीन हजार होता. यात यंदा कमालीची घट झाली असून ऑक्‍टोबरअखेर केवळ बाराशे वाहनचालकांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकीकडे बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे करण्यात येणारी कारवाई नगण्य असल्याचे दिसून येते.

बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून अनेक चौकांत सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तर, काही प्रमुख चौकांत स्वतः वाहतूक पोलिसांकडून मॅन्युअली कारवाई केली जाते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत यंदा घट झाली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हिंग, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे या गुन्ह्यांसाठी वाहनचालकाचे लायसन्स जप्त केले जाते. यानंतर पुढील निलंबन कारवाईसाठी ते आरटीओकडे पाठवण्यात येते. मात्र, या कारवाईचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ता सुरक्षा समितीने नुकतेच राज्यातील वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांना अधिकार असूनही परवाना निलंबनाची कठोर कारवाई करण्यात पोलिस हात आखडता घेत असल्याचे समितीने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात शहरात लायसन्स निलंबन कारवाईचा आढावा घेतला असता, यंदा 31 ऑक्‍टोबर 2018 अखरे केवळ 1257 वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक प्रमाण हे क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्यांचे आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दंडात्मक कारवाईचे प्रमाण अधिक
वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून संयुक्तपणे करण्यात येणाऱ्या लायसन्स निलंबन कारवाईचा टक्का कमी असला, तरी शहरांतर्गत केल्या जाणाऱ्या दंडात्मक कारवाईचे प्रमाण जास्त आहे. नो पार्किंगमध्ये वाहने लावणे, झेब्रा क्रॉसिंग, फुटपाथवरुन वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईचे प्रमाण अधिक असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)