वाड्यांबरोबर बदलली जीवनशैली

एक वेळ अशी होती की, वाड्यातल्या घरात पडदे लावायचे म्हटले तरी घरातील स्त्री “नको हं, समोरच्या साठेकाकूंना राग येईल, त्या लगेच म्हणतील आम्ही तुमच्या घरातले बघतो असं वाटतं का?’ म्हणून पडदे लावलेत का, असं विचारतील. ‘ पण ही परिस्थिती कळत नकळत कशी मागे पडली हे आता आठवतही नाही. त्यावेळेस वाड्यांमध्ये घराच्या रचना विशिष्ट प्रकारच्या असायच्या. लोखंडी सळ्या भिंतीच्या वरच्या दीड फुट भागात असायच्या आणि घराला उजेडाची सोय केलेली असायची. त्यामुळे पडदे लावायची गरजच पडायची नाही. मग पडदे लावायला सुरुवात तरी केव्हा झाली असेल! बघा हे कारण तुम्हाला पटतं का ते, दूरदर्शन संच आले आणि त्यावर प्रकाशझोत आला की टीव्ही दिसत नाही यासाठी त्यांना गरज वाटू लागली असणार!

त्यावेळी पडदे तरी काही मुद्दाम बाजारात जाऊन चिकित्सकपणे आणलेले नसायचे. तर एखाद्या चांगल्या डिझाईनची डार्करंग असलेली वापरलेली साडीच त्यासाठी वापरली जायची. नॉयलॉनची वायर किंवा स्प्रिंग यात घालून अडकवला जायचा. एवढंच नाही तर पडद्याचे दोन सेटही नसायचे तर धुवून उन्हात वाळत घालायचा आणि वाळला की पुन्हा वापरायला सुरुवात. अशा परिस्थितीत पडद्याच्या कापडांची दुकान किंवा एखाद्या दुकानात यासाठी वेगळा विभाग अशी कल्पनाही केली जात नव्हती.

-Ads-

वाड्यांचे फ्लॅटस्‌ झाले आणि पडद्यांची गरज जास्त भासू लागली. कारण मर्यादित जागेतले फ्लटॅस्‌ त्यामुळे समोरासमोर खिडक्‍या, घरातले माळे, दोन खोल्याच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी दार असेलच असे नाही. म्हणजे ओघाने पडदे आलेच आणि तेव्हांपासून पुणेकर जास्त चोखंदळ झाले. तरीही कॅम्प, प्रभातरोड, मॉडेल कॉलनी या भागात मात्र असं नव्हंत बरं का! ते आधीपासूनच या सगळ्याविषयी फार जागरूक होते. पण वापरण्याचे प्रमाण वाढले आणि बॉम्बे डाईंग बरोबरच्या इतरही मिलच्या कापडाची ओळख झाली.

नंतर नंतर घराच्या रंगसंगतीला मॅचिंग पडदे आले. घराचा रंग बदलला कि मॅचिंग पडदे आले, इतकी प्रगती झाली. पडदे ही चैन न वाटता गरज वाटू लागली. इतकच नाही तर मॅचिंगचे हूकही आले.

यावेळेस मात्र साठेकाकूंना काय वाटेल याची चिंता वाटणही बंद झालं आणि तेच स्टॅण्डर्ड वाटू लागलं. खिडकीतून एकमेंकीशी गप्पा मारणं सुद्धा पटेनासे झाले. विशेष म्हणजे वाडा असताना खिडकीचा पडदा बाजूला सारून एकमेकींशी बोलायला काही वाटत नव्हतं. पण नंतर हेच “मॅनरलेस’ पणाचं वाटायला लागलं एवढचे नाही तर आणखीनही झालेले बदल आपण पाहूच.

– डॉ. नीलम ताटके

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)