वाडेकर सरांच्या जाण्याने भरून न येणारे नुकसान – सचिन तेंडुलकर 

शासकीय इतमामात अजित वाडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार
मुंबई: माझ्या आयुष्यात अजित वाडेकर सरांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. वाडेकर सरांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे निधन म्हणजे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. हे एकप्रकारे माझे वैयक्‍तिक नुकसान असल्याचेही मी म्हणेन. लोकांनी वाडेकरांना महान क्रिकेटपटू म्हणून बघितले. पण मी भाग्यशाली आहे, एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्‍ती म्हणून वाडेकरांना मी अत्यंत जवळून पाहिले आहे. माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे होते, अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकरने भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
वेस्ट इंडीज व इंग्लंडमध्ये भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना बुधवारी रात्री प्रकृती ढासळल्याने जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वाडेकर यांच्यावर आज शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संदीप पाटील, पद्माकर शिवलकर, नरी कॉन्ट्रॅक्‍टर, विनोद कांबळी आदी अनेक माजी खेळाडू उपस्थित होते. त्याआधी वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
अनेक मान्यवरांनी वाडेकर यांना श्रद्धांजली वाहिली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील आपल्या भावना व्यक्‍त केल्या. मला अजूनही लक्षात आहे की, जेव्हा मी 20 वर्षांचा होतो तेव्हा परिस्थिती खूपच नाजूक होती. या वयामध्ये लक्ष विचलित होण्याची शक्‍यता अधिक असते. अशावेळी एका अनुभवी व्यक्‍तीच्या मार्गदर्शनाची मला गरज होती. वाडेकर सरांच्या रूपाने मला ते मार्गदर्शन मिळाले, असे सांगून सचिन म्हणाला की, खेळाडूंच्या गुणवत्तेला कशाप्रकारे चालना द्यायची हे वाडेकर सरांना माहिती होते. मला गरज असताना ते बरोबर त्या ठिकाणी हजर असायचे.
ते जेव्हा भारतीय संघासोबत होते, तेव्हा मला स्वतःला वाडेकर सरांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. वेळोवेळी मला त्यांच्याकडून अनेक संदेश मिळायचे. फलंदाजी करतानाही त्यांचे संदेश येत असायचे, असे सांगून सचिन म्हणाला की, ते भारताचे महान कर्णधार, प्रशिक्षक आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचे म्हणजे ते माझे अत्यंत चांगले मित्र होते. आमची मैत्री अशी होती की, संध्याकाळी आम्ही कोणत्याही विषयांवर गप्पा मारायचो. त्यामुळे आमचे नाते खूप घट्ट झाले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटविश्‍वात मोठी पोकळी निर्माण झाली असून माझे वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना माझ्या मनात आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)