वाठार स्टेशन येथील एटीएम असून नसल्यासारखे

वाठार स्टेशन : एटीएममध्ये पैसे नसतानाही उभे असलेले ग्राहक.

परिसरातील जनतेतून नाराजीचा सूर

वाठार स्टेशन, दि. 11 (प्रतिनिधी) – वाठारस्टेशन येथील एटीएम सेंटरमध्ये पैशाचा खडखडाट झाला असल्याने नागरिक वैतागले आहेत. तालुक्‍यातील प्रमुख बाजारपेठ असूनही एटीएम सेंटर असून नसल्यारखी परिस्थती आहे. ग्राहकांच्या खात्यातून एटीएम चार्जेस वसूल करणाऱ्या बॅंकांनी तशी सुविधाही पुरवावी, अशी मागणी संतप्त ग्राहकांमधून होत आहे.
वाठारस्टेशन ही कोरेगाव तालुक्‍यातील प्रमुख आणि महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. शाळा, हॉस्पिटल, महाविद्यालय, राष्ट्रीयकृत बॅंका, मोठी बाजारपेठ यांचा समावेश असल्याने वाठार स्टेशन नेहमी गजबजले असते. परिसरातील विखळे, जाधववाडी, फडतरवाडी, दाणेवाडी, तळीये, बीचुकले, नलवडेवाडी, गुजरवाडी, देऊर, पळशी व भाडळे खोरे येथून खरेदीसाठी लोक येत असतात. अशावेळी लोकांना पैशांची गरज लागते. दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे बॅंका बंद असल्यामुळे सहाजिकच लोकांना एटीएमचा आधार घ्यावा लागला. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसात बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैशाचा खडखडाट होता. पैसे काढणारे ग्राहक एटीएमला धडका मारून जात होते. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाणारा ग्राहक बाहेर येताना बॅंकेच्या नावाने ओरडत असे. बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. वाठार स्टेशनच्या बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले लोक खरेदी न करताच परत गेले. तसेच वाठार स्टेशनमध्ये बॅंक ऑफ बडोदाचे सुद्धा एटीएम आहे. परंतु तेही असून नसल्यासारखे आहे. जनतेची होणारी गैरसोय बॅंकांनी थांबवावी, अशी मागणी प्रवासी, व्यापारी, ग्राहक, व परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

 

बॅंक ऑफ बडोदा व बॅंक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बॅंकेच्या एटीएम मध्ये अनेकदा पैशाची उणीव भासत असते. त्यामुळे लोकांची अडचण होते, तसेच बॅंक ऑफ बडोदा चे एटीएम मर्यादित कालावधीसाठी उघडे असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन बॅंकांनी चोवीस तास एटीएममध्ये पैशाची सोय करावी व पंचक्रोशीतील लोकांची होणारी गैरसोय टाळावी.
सदाशिव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)