वाठार स्टेशनजवळ रेल्वे इंजिन घसरले

रेल्वे पुलावर अपघात, चालकाच्या प्रसंगावधानामुळे दीड हजार प्रवासी बचावले

वाठार स्टेशन, दि. 2 (वार्ताहर) – पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर वाठार रेल्वे स्टेशननजिक महाकाली मंदिर येथील रेल्वे पुलाजवळ पुणे-कोल्हापूर प्रवाशी रेल्वे गाडीचे इंजिन घसरले. इंजिन दीडशे ते दोनशे मीटर रेल्वे मार्ग सोडून फरफटत गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथून कोल्हापूरकडे जाणारी प्रवाशी रेल्वे गाडी नंबर 51409 ही दुपारी तीनच्या सुमारास वाठार रेल्वे स्टेशननजीक आल्यावर रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे सुमारे दोनशे मीटर इंजिन रेल्वे रूळ सोडून बाजूला झाले. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली व केवळ इंजिनच रूळ सोडून खाली आले. पाठीमागे असलेले प्रवाशी डबे रुळावरच थांबले. गाडीतून जवळपास दीड हजारांहून प्रवाशी होते.
ज्याठिकाणी घटना घडली आहे.त्याच्या पाठीमागे खोल दरी व पुल आहे.तेथील पुल ओलांडून गाडी पुढे आल्यावर सदरची घटना घडली आहे. पुलावर अथवा पुलाच्या आसपास जरी ही दुर्घटना घडली असती तर मोठी जीवित हानी झाली असती. गाडीचा चालक एस. के. पत्की याने याबाबत बोलताना सांगितले कि, अचानक काहीतरी झाल्याचा आवाज आला आणि मी इमर्जन्सी ब्रेक दाबले. तरी इंजिन जवळपास दोनशे मीटर रेल्वे रूळ सोडून फरफटत गेले. केवळ चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानानेच आज मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु होती. मात्र, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, दुर्घटना स्थळावर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. वाठार स्टेशन पोलीस व रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सातारा व कोल्हापूर येथे जाण्यासाठी खाजगी वाहने उपलब्ध करून दिली. साडेचारच्या सुमारास लोणंद बाजूकडून दुसरे इंजिन आणून प्रवाशी डबे लोनंद रेल्वे स्टेशन कडे नेण्यात आले. पुणे व मिरज जंक्‍शन वरून क्रेन आल्यावर इंजिन बाजूला करून वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. घटनास्थळी मंडल रेल प्रबंधक मिलिंद देवस्कर तातडीने हजर झाले. रेल्वे वाहतूक तातडीने सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)