वाटमारी करणाऱ्यांनी ओलांडली हद्द

पाकिटमारीस विरोध; तरुणावर कटरने आठ वार : 23 टाके
पुणे – शहरात वाटमारी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना मारहाण करून मोबाईल, पैशाचे पाकिट आदी किंमती ऐवज चोरला जात आहे. या वाटमाऱ्यांच्या मारहाणीचे प्रकार नागरिकांच्या जीवावरही बेतू लागले आहेत.

अशाच एका घटनेत तरुणाने त्याच्या खिशातील पाकिट चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोध केल्याने त्याच्यावर ब्लेडने आठ वेळेस वार करण्यात आले. तरुणाच्या छातीवर, चेहऱ्यावर, हनुवटीकर, ओठावर, गालावर, कानावर आणि हातावर हे वार केले आहेत. तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे तिघा चोरट्यांनी एकट्या तरुणावर हा हल्ला केला आहे. त्याला 23 टाके पडले आहेत. अजिंक्‍य गंगाधर ओव्हाळ (29, रा. कोथरुड), आदित्य अश्‍विन डाके (20, रा. कोथरुड) व आदित्य गणेश आदमाने (21, रा. कोथरुड) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी 25 वर्षीय तरुण शांतु सलीम शेख (25, रा. बुधवार पेठ) असून तो बुधवार पेठेत राहातो. तर, ही घटना पहाटेच्या सुमारास सागर बिल्डींग दुसरा मजला येथे घडली. हा तरुण त्याच्या मित्रास भेटून घरी परतत असताना ही घटना घडली. यातील आरोपी अजिंक्‍य याने फिर्यादी तरुणाच्या पॅन्टच्या मागच्या खिशातील पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने प्रतिकार करताच अजिंक्‍य व त्याच्या दोन साथिदारांनी त्याला मागील बाजूने पकडून शिवीगाळ व हाताने मारहाण केली. यानंतर कटर ब्लेडने त्याच्यावर वार केले.

त्याच्या किंकाळ्याने परिसरातील नागरिक धावून आल्यावर आरोपींनी पळ काढला. फरासखाना पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी काही तासांतच आरोपींना जेरबंद केले. त्याने दिलेल्या फिर्यादीत तो भाजीपाला विक्रीचे काम करत असल्याचे म्हटले आहे. त्याचा मित्र त्याच्यासाठी नवीन पॅन्ट घेऊन आल्याने तो घरातून खाली आला होता. पॅन्ट घेऊन वरती जात असताना त्याच्यावर हल्ला झाला. यावेळी त्याने आरडाओरडा केल्याने त्याचा मित्र अब्दुल तेथे दाखल झाला. तसेच गस्तीवरील पोलीसही दाखल झाले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत.

कामगारास लुटणाऱ्यास नागरिक, पोलिसांनी पकडले
कामगारास लुटणाऱ्या दोघांना नागरिक व पोलिसांनी पकडल्याची घटना कोंढवा-मिठानगर येथे घडली. याप्रकरणी शाहीद शेख (21, रा. कोंढवा खुर्द) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर, रफिक हुसेन शेख (23) व शेहनशा नुरआलम सैय्यद (20, दोघेही रा.कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी हे नाना पेठेतील एका स्पेअर पार्टच्या दुकानात काम करतात. ते काम संपवून मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकातून घरी चालले होते. यावेळी तिघाही आरोपींनी त्यांना हाताने मारहाण करून त्यांच्या खिशातील सहा हजार रुपयांची रोकड लुटली. यानंतर फिर्यादीने घरी जाऊन नातेवाईक व मित्रांना याची माहिती दिली. त्यानुसार हे सर्वजण आरोपींच्या शोधात निघाल्यावर त्यांनी तिघे आरोपी एका मैदानावर बसलेले दिसले. यानंतर त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. तेथे मार्शल दाखल झाल्यावर त्यांनी पोलिसांच्या मदतीने आरोपींना जेरबंद केले. यानंतर त्यांना बिबवेवाडी पोलिसांकडे सोपवण्यात आले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. घावटे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)