वाचाळ इमरान खान (अग्रलेख)

शिख धर्माचे संस्थापक, गुरूनानक यांची 550 वी जयंती पुढील वर्षी आहे. त्यानिमित्त भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानकसाहिब आणि पकिस्तानच्या पंजाबमधील शिख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारा 4.7 किमीचा रस्ता सध्या भारत-पाकिस्तानच्या संयुक्‍त सहमतीमधून होत आहे. पाकिस्तानने नुकतीच या कॉरिडॉरची पायाभरणी केली. या कार्यक्रमाला भारतातर्फे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल व हरदीपसिंग पुरी यांच्यासह पंजाब कॉंग्रेसचे मंत्री – माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित होते. तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाज्वादेखील उपस्थित होते. दोन्ही देशांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होण्याची गरज व्यक्‍त करतानाच त्यांनी “मैत्रीसाठी भारताने एक पाऊल पुढे टाकले, तर पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल,’ या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

मात्र, या कार्यक्रमावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेली बालिश वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली आहेत. भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याबाबत इमरान खान यांनी केलेले ताजे वक्तव्य म्हणजे अपरिपक्‍व राजककारणाचा नमुना ठरले आहे. इमरान खान म्हणतात की, “भारतासोबत मला बळकट संबंध हवे आहेत. भारताने यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर पाकिस्तान दोन पावलं पुढे टाकण्यास तयार आहे. जर एकमेकांशी अनेक युद्ध लढलेले फ्रान्स आणि जर्मनी शांततेत जगू शकतात तर भारत आणि पाकिस्तान का नाही?’ असा सवालही त्यांनी केला आहे. “मी, माझ्या पक्षासह अन्य सर्व राजकीय पक्ष, आमचं लष्कर, सर्व संस्था एकत्र, एकमताच्या आहेत. आम्हाला पुढे जायचंय’, असं म्हणत असलेल्या खान यांनी उभय देशांमधील दहशतवादाच्या समस्येवर मात्र, काहीही भाष्य केलेलं नाही. आता इमरान खान यांच्या या वक्तव्याला किती गांभीर्यानं घ्यायचं, हे ठरवावं लागणार आहे. मात्र, हे सांगत असताना, पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादावर आपण काय उपाय योजणार आहोत, हे त्यांनी सांगितलेलं नाही.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचा निकटचा मित्र समजल्या जात असलेल्या अमेरिकेनेच पाकिस्तानला “दहशतवादी राष्ट्र’ म्हणून घोषित केल्यानंतर आणि मोठी लष्करी व आर्थिक मदत कमी केल्यानंतर पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. अशातच पाकिस्तानचे चीनशी संधान साधले आणि लष्करी तसेच आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नालाही मर्यादित यश मिळत असल्याचे दिसताच, इमरान खान यांना भारताशी सुरळीत संबंध प्रस्थापित करण्याची उबळ आली असावी. चीनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका नकाशामध्ये, “पाकव्याप्त काश्‍मीर’ हा भारताचा भाग’ दाखवल्याने त्याची जगभर प्रतिक्रिया उमटली आहे. खरे तर, काही महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत “पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले, आणि पक्षाचे प्रमुख, माजी क्रिकेटपटू इमरान खान नियाझी हे पंतप्रधानपदी आरुढ झाले.

विश्‍वचषक मिळवून देणारा खेळाडू या प्रतिमेला कॅश करत इमरान खान आणि राजकारणात प्रवेश केला आणि पंतप्रधानपदावर आता ते विराजमान आहेत. मात्र, ज्याप्रमाणे क्रिकेटला “स्लेजिन्ग’चा शाप आहे, त्याच पद्धतीची वाचाळ वक्तव्ये आता इमरान खान करत असल्याने ते परत एकदा चर्चेत आले आहेत. भारत -पाकिस्तानमधील संबंध हा विषय भारताच्या फाळणीपासून सातत्याने एक तणावाचा विषय बनून राहिला आहे. पाकिस्तानने भारतावर दोन वेळा थेट आक्रमणही केले होते आणि; पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान वेगळा करताना, भारताने बांगला देशच्या लढ्याला केलेली मदत या पाकिस्तानच्या कपाळावरच्या भळभळत्या जखमा असून काश्‍मीर हे राज्य आपल्या पंखाखाली घेण्याचे त्यांचे मनसुबे आजवर धुळीलाच मिळालेले आहेत. त्यासाठी सातत्याने पाकिस्तान “प्रॉक्‍झी वॉर’चा आधार घेत असून सततच्या दहशतवादी कारवायांतून भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी डिवचत आहे.

आजवर भारताने पाकिस्तानची ही चाल यशस्वी होऊ दिलेली नाही. अगदी झुल्फीकार अली भुट्टो, बेनझीर भुट्टो अथवा नवाझ शरीफ यांच्यासारखे नेते पाकिस्तानात सत्तेत आले ते “भारतीय आक्रमणाची भीती’ दाखवतच. इमरान खान यांनीही तेच तंत्र अवलंबले होते. पाकिस्तानचे सर्वच नेते एकीकडे भारत-पाक संबंध सुधारण्याच्या दिखाऊ गोष्टी करत राहतात, तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या आक्रमक कारवायांना खतपाणी घालत राहतात. त्यामुळे इमरान खान यांचे ताजे वक्‍तव्य टिकेचा आणि विनोदाचा विषय बनले आहे.

कर्तारपूर कॉरिडॉरचा संदर्भ घेत, पाकिस्तानी नेते भारताबरोबरच्या चर्चेची स्वप्ने रंगवत असले, तरी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी नेहमीच्या कणखरपणाचा प्रत्यय देत, अशा चर्चेच्या सर्व शक्‍यता फेटाळून लावल्या आहेत. “जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले बंद केले जात नाहीत, तोपर्यंत कसलीही चर्चा होणार नाही,’ असे स्वराज यांनी ठणाकावून सांगितले आहे. उभय देशांमधील संबंध मैत्रीचे होण्यासाठी पाकिस्तानकडून जोपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत “कर्तारपूर कॉरिडॉर’, क्रिकेट अथवा अन्य गोष्टींच्या आडून, भारत-पाक प्रश्‍न सुटेल, असा भारताचा भाबडा आशावाद मुळीच नाही. भारताच्या आजवरच्या भूमिकेला साजेसाच प्रतिसाद स्वराज यांनी पाकिस्तानला दिल्याने, सध्या तरी इमरान खान यांचे मनसुबे उधळले गेले आहेत, हे नक्‍की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)