वाचनामुळे येणारी परिपूर्णता व्यक्‍तिमत्व घडविते

सुनील शिंदे : “वाचते व्हा.. लिहिते व्हा’ विषयावर अकोले येथे व्याख्यान

मनाचे पावनपण, कुतूहलातून उत्तम निर्मिती होते

अकोले- ग्रामीण वाड्यावस्त्यांमधील गुणवत्ता पुढे यावी, त्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे. वाचनामुळे येणारी परिपूर्णता व्यक्‍तिमत्त्व घडविते, असे प्रतिपादन डॉ.सुनील शिंदे यांनी केले.
अकोले येथील येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर विद्यालयाच्या हीरक महोत्सवी कार्यशाळेत ते बोलत होते. “वाचते व्हा.. लिहिते व्हा’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक ए. जी. सावंत होते.

वाचनामुळे येणारी परिपूर्णता माणसाचे व्यक्‍तिमत्व घडविते, छापिसनी रे झाला कोरा कागद शहाणा, अशा सूचक विचार काव्यातून मांडणाऱ्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरींनीसुद्धा समृद्ध वैचारिक वारसा मराठीला दिला, असे त्यांनी सांगितले. वाचन तसेच लेखनाचे जीवनातील स्थान समजावताना डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, दीर्घायुषी ठरलेल्या योगिया चांगदेवाच्या सूचक कोऱ्या पत्राला माऊली ज्ञानदेवाने पासष्ट ओव्यांत दिलेले पत्रोत्तर “चांगदेव पासष्टी’ च्या रूपाने अक्षर साहित्य ठरते! अगदी खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांत आणि दऱ्याखोऱ्यांतदेखील गुणवत्ता सुप्तपणे दडलेली आहे.

चौकसपणे लिहिते वाचते होणे गरजेचे आहे. बहिणाबाई, सावित्रीबाई फुले यांनी राज्यासह अवघ्या विश्‍वाला शिक्षणाची प्रेरणा दिली आहे. मनात असेल ते सहज, मोकळे, नि:संकोच लिहावे, रोजनिशीची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

आपण निर्मिती करतो, विध्वंस करतो, पुन्हा निर्मिती करतो. अंतिम रुपाची कुणालाच कल्पना नसते, असा कुराणातला दाखला देणारे विख्यात वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम “अग्निपंख’ ग्रंथात “अर्थववेदाची’देखील उदाहरणे देतात. आकाश, अमर्याद समुद्र आणि लहानशा तळ्यातील विधात्याचे अस्तित्व डॉ. कलाम सुरेख लेखनातून स्पष्ट करतात. मनाचे पावनपण आणि कुतूहलातून उत्तम निर्मिती तसेच जडणघडण होते, असे त्यांनी सांगितले.

सावंत यांनी शालेय-महाविद्यालयीन नियतकालिकांतील वाचन, लेखनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. शिंदे यांनी विद्यालयास त्यांची पुस्तके भेट दिली. प्रा. वीना सावंत, एस. आर. गिरी, अनिरुद्ध शाळिग्राम यांच्यासह शिक्षक वर्ग याप्रसंगी उपस्थित होता. ग्रंथपाल अशोक मंडलीक यांनी परिचय करून दिला व प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)