वाघ नखांची कराडात तस्करी

कराड, दि. 8 (प्रतिनिधी) – वाघ नखांची तस्करी करणार्‍या एका अल्पवयीन मुलासह दोघांवर कराड तालुक्यातील वडगाव हवेली याठिकाणी शुक्रवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या दोन वाघ नखे, दोन चाकू व मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अवधूत जगदीश जगताप (वय 18, रा. खुबी, ता. कराड) असे संशयिताचे नाव असून त्यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असले तरी वाघ नख्यांची तस्करी करणारी टोळी असण्याची शक्यता असून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव हवेली येथे पेट्रोल पंपाजवळ जंगली प्राण्यांच्या वाघ नखे विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार डीवायएसपी ढवळे यांनी पोलीस उपनिरीक्षक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी वडगाव हवेली येथे इसार पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला. कराड-तासगाव मार्गालगत पेट्रोल पंप परिसरात पोलीस दबा धरुन बसले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरुन दोन तरुण तेथे आले. रस्त्याकडेला इसार पेट्रोल पंपाजवळ ते उभे राहिले असता त्या तरुणांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याजवळ जाऊन चौकशी केली. तसेच खात्री करण्यासाठी प्राण्यांच्या नखांबाबत डील करण्यास सुरुवात केली. त्यानुसार 17 हजार रुपयांना दोन वाघ नखे यावर त्यांचा सौदा फायनल झाला. त्यानंतर पोलिसांनी संशयितांजवळील वाघ नख्या घेतल्या व पैसे देण्याचा बहाणा करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी संशयितांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाजूलाच झुडपाजवळ पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अवधूत जगदीश जगताप रा. खुबी असे एकाने आपले नाव सांगितले. तर दुसरा अल्पवयीन असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. दोन पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन धारदार चाकू आढळून आला. तसेच ज्या मोटरसायकलवरुन ते आले होते. ती मोटरसायकल, दोन चाकू व वाघनखे पोलिसांनी जप्त केले आहेत.
डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक भापकर, सागर बर्गे व पोलीस पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर अटक केलेल्या अवधूत जगताप याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या वाघ नखांबाबत वन विभागाचे अधिकारी सुजित गवते यांच्याशी संपर्क साधला असता, त्या वाघ नखे जंगली हिंस्र प्राण्यांच्या (वाघाच्या) असून त्याची किंमत साधारणत: पाच लाख रुपये होत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले असले तरी वाघ नखांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असावी, असा अंदाज व्यक्त केला असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)