वाघोली- वाघोली-लोहगाव रस्त्याने वाघोली गावठाणातून जाणाऱ्या अवजड व मोठ्या उंचीच्या वाहनांना बंदी घालण्यात आली असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने यासाठी 8 फुट उंचीचे लोखंडी बॅरीकेड उभारण्यात आले आहे. वाघोली गावठाणात अवजड वाहनांचा होणारा शिरकाव व वाहतूक कोंडी बॅरीकेडमुळे थांबणार आहे.
वाघोली-लोहगाव रस्ता सध्या वर्दळीचा होऊ लागला आहे. पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यावर अनेक वाहने वाघोली-लोहगाव या रस्त्याने गावठाणामार्गे जात असतात. अरुंद रस्त्यातून वाहने जात असल्याने अनेक वेळा गावठाणातच वाहतूक कोंडी होते. याचा त्रास ग्रामस्थांना होत असल्याने कमी उंचीचे बॅरीकेड उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
रविवारी (दि. 19) रोजी गावठाणात 8 फुट उंचीचे बॅरीकेड उभारण्यात आले आहे. यामुळे जास्त उंचीचे वाहन जाउ शकत नाहीत. सध्या तात्पुरत्या स्वरुपात एक बॅरीकेड उभारले असून वाहतूक कोंडीचा अंदाज पाहून गरज वाटल्यास आणखीन बॅरीकेड उभारले जाणार आहेत. वाघोली ग्रामस्थांच्या वतीने बॅरीकेड उभारल्याचे स्वागत केले जात आहे.
याविषयी ग्रामस्थ गणेश दाभाडे यांनी सांगितले की, अवजड व मोठी वाहने वाघोली-लोहगाव अरुंद रस्त्याने जात असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती. माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांच्या प्रयत्नातून बॅरीकेड बसविण्यात आले असून यामुळे गावठाण रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)