वाघोली उपकेंद्राच्या भूमिगत केबलची लोणीकंदमध्ये अडवणूक

वाघोली-येथील महावितरणच्या पूर्वरंग स्विचिंग उपकेंद्रापर्यंत 22 केव्ही उच्चदाब भूमिगत वाहिनीचे केबल टाकण्याचे काम पूर्णत्वास आले असून, तुळापूर फाटा, लोणीकंद या ठिकाणी मात्र या भूमिगत वाहिनीच्या केबलचे नुकसान करून काम अडविण्याचे प्रकार सुरू आहेत. केबल टाकण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त देण्याची मागणी उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. भूमिगत वाहिनीचे काम पूर्ण झाल्यास वाघोलीची वीज गायब होण्याच्या समस्या आटोक्‍यात येणार असल्याचे महावितरण कडून सांगण्यात येत आहे.
पूर्वरंग स्विचिंग उपकेंद्रापासून वाघोली परिसराला विद्युत पुरवठा केला जातो. या उपकेंद्राला ओव्हरहेड केबल टाकून विद्युत पुरवठा जात असताना काही वेळी नैसर्गिक आपत्ती, पक्षी बसणे, लोड वाढणे अशा अनेक समस्या उद्‌भवत असतात. यामुळे वाघोली आणि परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन अनेकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याच गोष्टीवर मत करण्यासाठी महावितरणच्या पायाभूत आराखडा योजना-2 अंतर्गत वाघोली उपकेंद्रासाठी लोणीकंद येथून भूमिगत वाहिनीचे केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सद्यःस्थितीत केबल टाकण्याचे काम पूर्णत्वास आले असताना तुळापूर फाटा, लोणीकंद येथे काही स्थानिक ग्रामस्थांनी जाणीवपूर्वक रस्त्यालगत वाहिनी टाकण्याचे काम अडवून जेसीबीने भूमिगत वाहिनीला टोचे मारून नुकसान केले आहे, तसेच हाय-वेच्या वाहनांच्या कारणास्तव तुळापूर फाटा येथे पुणे-नगर हाय-वेलगत रोड क्रॉसिंग दोन उपरी 22 केव्ही चालू वाहिन्यांची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले असतानाही काही ग्रामस्थ उंचीचे पोल टाकण्यास मज्जाव करीत आहेत, त्याचप्रमाणे उद्धट अरेरावीची भाषा करून काम थांबविलेले आहे. वाघोली व परिसराच्या गावातील विद्युत पुरवठ्याच्या दृष्टीने भूमिगत वाहिनीचे काम पूर्ण होणे आवश्‍यक असल्याने काम करण्यासाठी पोलीस सरंक्षण मिळावे अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

  • वाघोली आणि परिसरातील विजेच्या वाढत्या समस्या पाहता भूमिगत वाहिनीचे काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, लोणीकंद येथे ग्रामस्थ मोबदल्याच्या विषयावरून काम अडवत आहेत. महावितरणच्या महत्त्वाकांक्षी योजना अडविल्यामुळे वाघोलीतील विद्युत पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    – अमित भरते, उपकार्यकारी अभियंता

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)