वाघोलीत दारूबंदीचा ठराव

ग्रामसभेत ना हरकत दाखल्यावरून वाद : तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड

वाघोली: वाघोली ग्रामपंचायतीची मंगळवारी (दि.28) घेण्यात आलेली ग्रामसभा दारू दुकान आणि सांस्कृतिक कला केंद्र यासाठी ना हरकत दाखला, तंटामुक्त समिती अध्यक्षपद यावरून भर पावसात चांगलीच गाजली. ना हरकत दाखल्यांच्या मुद्‌द्‌यावरून गावात दारूबंदीचा तसेच अवैध धंदे बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पुढील पाच वर्षांसाठी पाच जणांची निवड केल्याचा ठराव करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ग्रामसभेमध्ये सुरुवातीला मागील सभेच्या कामकाजाचा वृतांत वाचून कायम केला. यानंतर विविध योजनांचे लाभार्थी निवड, प्लॅस्टिक बंदी, ग्राम सुरक्षा दल स्थापनेचे विषय घेण्यात आले. आलेल्या अर्जाचे वाचन करताना दारू दुकाने, बिअरबार यांना ना हरकत मिळावी, यासाठीचे अर्ज ग्रामसभेसमोर ठेवण्यात आले. ना हरकत दाखले द्यावेत अन्यथा सर्वच गावातील दारू बंद करावी, असा मुद्दा अर्ज केलेल्यांनी उपस्थित केला. यावरून काही काळ झालेल्या वादानंतर संपूर्ण गावामध्ये दारूबंदी करावी, असा ठराव करण्यात आला.

दारूबंदीच्या प्रक्रीयेसाठी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार व कार्यवाही ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामसभेत वाहतूक कोंडी, कचरा, पाणी, रस्ते या विषयांवर जास्त वेळ सखोल चर्चा होणे अपेक्षित असताना तंटामुक्त समिती आणि दारूबंदीवर अन्य मुद्‌द्‌यांवरून वाद होत असल्याने ग्रामसभेच्या कामकाजावर गावातील ज्येष्ठ मंडळींनी, ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)