वाघोलीत डम्परखाली चिरडून महिलेचा मृत्यू

वाघोली- पुणे-नगर महामार्गावरील वाघोली (ता. हवेली) येथे डम्परच्या चाकाखाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे वाघोली परिसरातील व विशेषतः महामार्गावरून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवणाऱ्या अशा डम्परचालकांच्या महामार्गावर बेशिस्त वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
फोनोमीला फर्नांडो (वय 64, रा.वाघोली) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ग्रेगरी फर्नांडो हे पत्नीसह (फोनोमीला फर्नांडा) दुचाकी (एमएच 02 बीके 2654)वरून पुणे-नगर महामार्गावरून बकोरी फाट्याकडे पत्नीसोबत घरी जात असताना त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला समांतर आलेल्या वाळूने भरलेल्या डंपरचा धक्का लागल्याने फर्नांडो यांची पत्नी फोनोमीला फर्नांडो या डंम्परच्या (एमएच 12 एयू 5394) मागील चाकाखाली आल्या. अपघात एवढा भीषण होता की, डम्परचे चाक त्यांच्या छाती व डोक्‍यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाघोली येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेल्यावर तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातस्थळावरून गर्दीचा फायदा घेत डम्परचालक पळून जाण्यास यशस्वी झाला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

  • डम्परचालकांची दादागिरी वाढली
    बहुतांश डम्पर हे राजकीय नेत्यांची व कार्यकर्त्यांची असल्यामुळे डम्पर चालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून नियम धाब्यावर बसवून ही जड वाहने रस्त्यावरून बेशिस्त धावतात, तरीही पोलीस, परिवहन व महसूल विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)