वाघोलीतील सोसायट्यांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

बंद फ्लॅट चोरट्यांचे टार्गेट ; सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वाघोली- हत्यारबंद चोरट्यांनी सोसायट्यांमध्ये धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या वाघोली परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तोंडाला मास्क लावून चोरटे सोसायट्यातील बंद फ्लॅटला टार्गेट करीत आहेत.
तीन दिवसांपूर्वी उबाळेनगर येथील ऑराकाउंटी आणि बाईफ रोडवरील कांचनपुरम सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हत्यारबंद चोरट्यांची हालचाल कैद झालेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वाघोलीतील सोसायटीचे नागरिक पाणी, कचरा, ड्रेनेजच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा करीत आहेत. या सोसायटीमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांची समस्या वाढू लागली आहे. तीन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी ऑरा काउंटी आणि बाईफ रस्त्यावरील कांचनपुराम सोसायटीमध्ये हत्यारबंद चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरी केली होती. त्यानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये चोरांची दहशत पसरली आहे.
याअगोदरही सोसायट्यांमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅटमध्ये चोरी केलेल्या घटना घडल्या आहेत. मात्र, चोरट्यांकडे असलेल्या हत्यारांसोबत त्यांच्या हालचालींचा व्हीडीओ व्हायरल झाला असल्याने वाघोली गावातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. सिद्धिविनायक नगरी सोसायटीमध्ये देखील किरकोळ चोरीचा प्रकार घडला होता. त्याचप्रमाणे गुरुवारी रात्री आयव्ही व्हिला सोसायटीच्या सीमाभिंतीचा पत्रा उचकटून सेफ्टी डोअर तोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, घरातील व्यक्तीला जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला.
पोलिसांनी रात्री गस्तीमध्ये वाढ करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी सोसायटीतील नागरिकांकडून होत आहे. चोरटे पकडले जात नसल्याने सोसायट्यांमध्ये चोरी करण्याची हिम्मत वाढत चालली आहे, अशी प्रतिक्रिया सोसायटीतील नागरिक देत आहेत.

 • सोसायटीने घ्यावयाची काळजी
  सोसायटीच्या सिमाभिंती सुरक्षित आणि मजबूत असाव्यात.
  संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असावा.
  दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस सुरक्षारक्षक तैनात असावेत.
  सोसायटीत विश्वासार्ह व प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमावेत.
  नागरिकांनी फ्लॅट बंद करण्यापूर्वी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात.
 • पोलिसांची संख्या कमी पडतेय
  पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील सर्वाधिक गुन्हे दाखल होणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये लोणीकंद पोलीस ठाण्याचा दुसरा क्रमांक लागतो. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या आणि पोलिसांची संख्या कमी असल्याने वाघोलीतील वाहतूककोंडी सांभाळून बाहेरील बंदोबस्त, पेट्रोलिंग, गुन्हेगारीला आळा घालताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सोसायटीमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी लोणीकंद पोलिसांनी पाऊले उचलली आहेत. वाघोलीतील 150 ते 200 नागरिकांचा ग्रामसुरक्षादल स्थापन करणार आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर मार्गदर्शन करून चोरीच्या घटनांना आळा बसत नाही. तोपर्यंत नागरिक आणि पोलीस एकत्रित गस्त घालण्याचे नियोजन केले जाणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)