वाघाच्या दर्शनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर शिक्‍कामोर्तब

कोयना पर्यटनाला चालना मिळणार : अनेक प्रश्‍नांना पूर्णविराम
सुर्यकांत पाटणकर
पाटण, दि. 27 – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळलेल्या पट्टेरी वाघामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही सुखावह घटना आहे. भविष्यात यामुळे कोयनेच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.या व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या अस्तित्वाबाबत अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. त्या प्रश्‍नांना पूर्णविराम मिळाला आहे. तर वाघाच्या दर्शनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर शिक्‍कामोर्तब झाले आहे.
कोयना धरणावरील जलविद्युत प्रकल्प, कोयना धरण, कोयना अभयारण्य यामुळे कोयनेची ओळख निर्माण झाली आहे. निसर्गरम्य परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगा तर आथांग पसरलेला शिवसागर जलाशय व त्या भोवती विस्तीर्ण पसरलेले घनदाट जंगल या कारणांनी कोयनेचे सौंदर्य या आधीच आधोरिखित झाले आहे. महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण आणि जैवविविधतेने संपन्न अभयारण्य म्हणून कोयना अभयारण्याकडे पाहिले जाते. शासनाने 1985 साली कोयना अभयारण्याची अधिसूचना काढली. 426.36 चौरस किलो मीटर एवढा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा समावेश कोयना अभयारण्यात आहे. तर चांदोली अभयारण्याचे 317.64 एवढे क्षेत्रफळ आहे. कोयना व चांदोली अभयारण्याचे क्षेत्रावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. पश्‍चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये राष्ट्रीय उद्यानाचा समावेश सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सिमेवर होतो. तर कोयना धरणाच्या बाजूने विस्तारलेल्या शिवसागर जलाशयाच्या बाजूने कोयना अभयारण्याचा विस्तार आहे. येथील जंगल निमसदाहरी आणि उंच सखल दऱ्याखोऱ्यांचे आहे. रस्ते नसल्याने येथील जंगल परिसर दुर्गम आहे व त्यामुळेच वन्य प्राण्यांना संरक्षण मिळाले आहे. अशा प्रकारच्या संरक्षित अधिवासामुळे येथे बिबटे, सांबर, गवा, रानकुत्री या वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. तर मालदीव, पाली, जुंगटी, करंजवडे ही ठिकाणे पट्टेरी वाघासाठी आदर्शवत आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे या पूर्वी मिळाले होते. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. 2010 साली कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघाचे पुसटसे फोटो मिळाले होते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ असण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली होती. या अगोदर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या विष्टा, ठसे आढळून आले होते. मात्र 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी तर 24 मे रोजी मध्यरात्री 12 वाजून 52 मिनिटांनी पट्टेरी वाघ कॅमेरा ट्रॅप मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचे सिध्द झाले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कोयना विभागातील अनेक गावांचे पुनवर्सन झाले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध होता. अगोदर माणूस जगला पाहिजे नंतर वाघ अशी भुमिका येथील भुमिपुत्रांनी घेतली होती. तर मानवी हक्क संरक्षण समितीची स्थापना ही करण्यात आली होती. त्याद्वारे अनेक वेळा मोर्चे, अंदोलने करण्यात आली होती. तर बफर झोन मधील गावे वगळण्याची मागणी ही शासनाकडे केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळलेला पट्टेरी वाघ हा शासन यंत्रणेने सोडल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ वर्षानंतर वाघ सापडतो ही संशयास्पद बाब आहे. कोयना अभयारण्याला आमचा विरोध नाही. मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे येथील जनतेला जाचक अटीचा सामना करावा लागत आहे त्याला विरोध आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्याला उपचारासाठी दोन एकर जमीन विकायची आहे. मात्र ती जमिन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असल्याने ती विकता येत नाही. अशी बंधने लादण्यात आली आहेत. त्याला आमचा विरोध आहे. राज्यात बत्तीस वाघ मरण पावल्याच्या बातम्या वाचतो. मात्र कोयना अभयारण्यात मरण पावलेल्या वाघांची आकडेवारी संबंधित विभागाकडे का नाही हा ही प्रश्‍न आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नसलेल्या वाघांचे लाड पुरविण्याचे काम सुरू आहे.
राजभाऊ शेलार, अध्यक्ष मानवी हक्क संरक्षण समिती पाटण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)