वाघाच्या ओढ्यावरील पूल बनला धोकादायक

सर्व कठडे तुटल्याने अपघाताचा धोका : प्रशासनाचे दुर्लक्ष

गोंदवले – गोंदवले बु. येथील असणाऱ्या फडतरे वस्तीवरील वाघाच्या ओढ्यावरील पुलाचे सर्व कठडे तुटलेले असून वाहनाना प्रवास करताना धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे. हे ठिकाण अपघातप्रवण असूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. किमान याठिकाणी धोकादायक वळण असल्याचा फलक तरी लावावा, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

-Ads-

सातारा-लातूर मार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा मिळाला असून याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गोंदवले बुद्रुक हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून ब्रम्हचैतन्य महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही दररोज भाविक याठिकाणी येत असतात. गोंदवले बुद्रुकमध्ये गावापासून एक किलो मीटरवर वाघाचा ओढा हे ठिकाण आहे. म्हसवड-पंढरपूरकडे जाताना या ठिकाणवरून जावे लागते. ओढ्याकडे जाताना दोन्ही बाजुला अवघड वळणाचा आणि तीव्र उताराचा रस्ता आहे. ओढ्यावरील पूल अरुंद असून संरक्षक कठडे तुटले आहेत.

पुल सुमारे पंधरा फुट खोल आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी दोनवेळा दुचाकीचे अपघात तर एका जीपचाही अपघात झाला आहे. जवळील वस्तीमधील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर या पुलावरील संरक्षक कठडे बसवावेत आणि सुचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)