पिंपरी – मागील काही दिवसापासून वाकड येथील वाय जंक्शनचे काम सुरु होते. अनेक वर्षांनंतर काम पूर्ण झाले म्हणून नुकतेच पालिकेच्या सत्ताधारी भाजप पक्षाने श्रेय लाटण्यासाठी आमदार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी यांनी घाईघाईने उद्घाटन केले. मात्र अवघ्या काही दिवसातच हा ग्रेडसेपरेटर पुन्हा बंद केल्याने उद्घाटनाचा घाट कशासाठी ? असा संतप्त सवाल नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केला आहे.
रहाटणी येथील साई चौक व वाकड येथील वाय जंक्शन रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरु आहे त्यामुळे औंध कडून डांगे चौक किंवा पिंपळे सौदागर येणाऱ्या वाहन चालकांना पिंपळे निलख मार्गे विशाल नगर चौकातून वळसा घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे यासाठी वाकड वाय जंक्शन चौक बंद करण्यात आला होता. हिंजवडी आयटी हब असल्याने पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. या मार्गावर सकाळ संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती म्हणून वाहन चालक त्रस्त झाले होते.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या काही दिवसापूर्वी वाय जंक्शन ग्रेडसेपरेटरचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. या अंडरपास ग्रेड सेपरेटरची एकूण लांबी 490 मीटर इतकी असून रुंदी 7.5 मीटर व उंची 5.5 मीटर इतकी आहे. यामुळे जंक्शन सिग्नल फ्री होणार असून बीआरटीएस बस सेवा जलद होणार आहे. तसेच वाकडहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त करीत होते. चला एकदाचा वनवास संपला असे म्हणत असतानाच पुन्हा ग्रेड सेपरेटर रस्ता वाहन चालकांसाठी बंद करण्यात आल्याने वाहन चालक संताप व्यक्त करीत आहेत. जर ग्रेडसेपरेटर बंदच करायचा होता तर सुरु केलाच कशाला असा संतप्त सवाल नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा