वाई शहरात डेंग्युच्या साथीचे थैमान

सिद्धानाथवाडीसह शहरातील घराघरात डेंग्युचा रुग्ण
सरकारी दवाखान्यासह खाजगीतही उपचारासाठी गर्दी
वाई, दि. 1 (प्रतिनिधी)
वाई शहरात विशेषत: सिद्धनाथवाडीत डेग्युच्या साथीने थैमान घातल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सिद्धानाथवाडी, गंगापुरी, नावेचीवाडी, रविवारपेठसह संपूर्ण शहरात प्रत्येक घरात डेंग्युचे रुग्ण आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्युच्या साथीने थैमान घातले असताना आरोग्य विभाग मात्र कुंभकराणाच्या झोपेत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे.
आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचेच वाई शहरातील चित्र आहे. शहरातील सरकारी दवाखान्यासह खाजगी दवाखान्यात रुग्णांना उभे राहण्यासाठी जागा शिल्लक नाही. शहरातील सर्वच दवाखाने तुडुंब भरलेले आहेत. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, कचऱ्यातून मोकाट जनावरे बिंधास्त वावरताना दिसत आहेत. डेंग्युच्या साथीने वाढत असलेली रुग्णांची संख्या ही अतिशय गंभीर बाब असून आरोग्य विभाकडून यावर त्वरित उपाय योजना करण्याची गरज आहे. या विभागाकडून कोणतीही उपाय योजना न झाल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. सरकारी दवाखान्यात लांबच लाब रांगा लस घेण्यासाठी लागलेल्या आहेत. परंतु सरकारी दवाखान्यात लसच शिल्लक नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. डेंग्युच्या साथीने सिद्धनाथवाडीत एवढे थैमान घातले आहे की कित्येक रुग्णांना पुण्याला हालवावे लागले आहे. डेंग्युच्या साथीपुढे वाईतील डॉक्‍टरांनी हात टेकले आहेत. शासकीय दवाखान्यात डॉक्‍टरांची कतरता असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. तरी आरोग्य विभागाने त्वरित यावर उपाय करून ही साथ आटोक्‍यात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, अशी मागणी जोर धरत आहे. सिद्धनाथवाडीत गेल्या एक महिन्यापासून डेंग्यु साथीने थैमान घातले आहे. याठिकाणी होत असलेला पाणीपुरवठा गढूळ असून वाई नगरपालिकेची शुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरली असून ती त्वरित बदलण्याची गरज आहे.
पालिकेला उरला नाही वाली
मुख्याधिकारी रजेवर असल्याने पालिकेला कोणी वाली उरला नाही. नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांना नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणंघेणं नाही. शहराच्या प्रत्येक प्रभागात अतिशय दयनीय अवस्था आहे. शहरातील गटारांची स्वच्छता वेळेवर होत नाही, त्यात कसल्याही पध्दतीची औषध फवारणी केली जात नाही. सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठ-मोठे ठराव करायचे परंतु, त्यावर कोणतीही अंमलबजावणी नाही. शहरातील निघणारा घनकचरा टाकण्यासाठी सध्या जागा उपलब्ध नाही. उचललेला कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे. त्यांचा पगार वेळेत होत नसल्याने ते अचानक संप पुकारत आहेत. नगराध्यक्षांसह सदस्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. एकमेकाचे पाय खेचण्यात ते मग्न आहेत. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.

डेंग्युवर उपाय योजना करण्यासाठी आरोग्य विभाग अतिशय तत्परतेने पावले उचलणार असून ज्या भागात डेंग्युचे प्रमाण जास्त आहे. त्या भागातील गटारांमध्ये औषध फवारणी, गटारे साफ करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. लवकरच ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करणार आहे व त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलावण्यात आली आहे.
चरण गायकवाड, आरोग्य सभापती, वाई नगरपालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)