वाई भागातील चित्रीकरणाला “गुंडगिरी’चे ग्रहण

पेशव्यांच्या दरबारातील मुस्सद्दी नाना फडणवीस यांनी मेणवली येथे बांधलेला वाडा ऐतिहासिक दस्ताऐवज बनला आहे. या परिसरासह वाड्यातही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पार पडले. परंतु, अलिकडे कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण होत नसल्याने मेणवली फडणवीस वाड्यातील वर्दळ थांबल्याने अनेकांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे.

अनिल काटे

मेणवली – सह्याद्रीच्या कुशीत वसलेली वाई आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे निसर्गसौंदर्याची खानच म्हणावी लागेल. अगदी सर्वसामान्यासह पर्यटकानाही या भागाने भुरळ घातली आहे. अगदी चित्रपटसृष्टीलाही या भागाने वेड लावले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळेच याभागात कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे चित्रकरण हमखास पहायला मिळणारच. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून वाई भागात होणाऱ्या या चित्रीकरणाला गुंडगिरीची ग्रहण लागल्यामुळे या भागातील चित्रकण बंदले पडले आहे.

-Ads-

दिग्गज चित्रपट निर्माते व दिग्ददर्शकांनी वाईकडे कायमचीच पाठ फिरवल्यामुळे लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल ठप्प होवून वाई तालुक्‍यातील अनेक व्यवसायिकांसह बेरोजगारांच्या रोजीरोटीवर गदा येवून “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरल्याची खंत व हळहळ वाई तालुक्‍याच्या जनतेतून व्यक्त केली जात आहे. संपूर्ण वाई तालुक्‍याची भौगोलिक परिस्थिती व नैसर्गिक अनकुलतेमुळे पन्नासच्या दशकापासून भारतभूषण, राज सिप्पी, सुभाष घई, प्रकाश झा, केदार शिंदे यासारख्या अनेक चित्रपट निर्मात्या दिग्ददर्शक दिग्गजांनी सुपरहिट हिंदी-मराठी सिनेमांचे वाईच्या पवित्र भूमित चित्रीकरण करून वाईला जगाच्या नकाशावर झळकवले आहे. गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे पासून ते हिरो, याराना, सरगम, दबंग, सिंघम, चेन्नई ऐक्‍सप्रेस, जत्रा, सर्जा यासारख्या सिल्वर जुब्ली चित्रपटासह ऑस्करपर्यत मजल मारलेल्या “स्वदेश’ चित्रपटासारखे सिनेमा या दक्षिण काशीच्या पवित्र भूमित चित्रीकरण करून वाईला जगाच्या नकाशावर आणले.

वाई तालुक्‍यात विविध ठिकाणी होणाऱ्या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान अनेक गरजुंना रोजगार उपलब्ध झाले. तसेच चित्रपट चित्रकरणासाठी सेवासुविधा पुरवताना अनेकांना चांगलाच धनलाभ मिळू लागला, हे लक्षात आल्याने या धनलाभाचा हव्यास वाढला गेला व यातूनच मिळणाऱ्या मलिद्यावरून ठेका मिळवण्यासाठी जोरजोरात रस्सीखेच सुरू हेवून अंतर्गत शीतयुद्ध सुरू झाले. त्याचे भडके उडून त्याचा परिणाम चित्रीकरणावर होवू लागला. चित्रीकरण बंद पडून निर्मात्यांचे दिवसाकाठी लाखो रूपयाचे नुकसान होवू लागल्याने सर्वच निर्माते व दिग्दर्शकांनी वाईकडे कायमची पाठ फिरवली. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुंदर निसर्ग सौंदर्य लाभल्यामुळे चित्रपट निर्माते दिग्ददर्शक दक्षिण काशी बरोबरच पश्‍चिम भागातील धोम जलाशयालगतचा परिसर मुगाव, धोम, मेणवली व अन्य इतर गावात चित्रपट चित्रीकरणास पहिली पसंती देत होते यातूनच या गावांना लाखो रूपयांचा महसूल मिळत होता. हप्तेगिरीच्या ग्रहणामुळे तोही बंद होवून गावाचे व पर्यायाने ग्रामस्थांचे नुकसान झाले. स्थानिकांचे रोजगार कृष्णेत बुडवले गेले, लॉजिंग व हॉटेल व्यावसायिक वाहनवाले, किराणा दुकानदार भाजीवाले, इस्रीवाले, धुलाईवाले यासह अनेक छोट्यामोठ्या कष्टकऱ्यांचा हक्काचा धंदाही भाई लोकांच्या दंबगिरीमुळे कृष्णामाईत बुडवल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

चित्रीकरणादरम्यान अनेक छोट्या मोठ्या बाबींची गरज आवश्‍यकता भासते. यासाठी स्थानिकांची मदत घेवून मागणीप्रमाणे पुरवठा केला जात असे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले कमिशन मिळते हे लक्षात आल्यामुळे अनेक गुंड प्रवृत्तींनी यात शिरकाव केला. बहुतांशी चित्रपट बीग बजेटचे असल्याने दिवसाला लाखो रुपयांची होणारी उलाढाल लक्षात घेता कष्ट न करता कमिशनद्वारे मजबूत पैसे मिळवण्यासाठी ऐकमेकांवर घाणेरडे कुरघोडीचे राजकारण सुरू होवून वाद उफाळून आल्याने बऱ्याच वेळा चित्रपट चित्रीकरण बंद पाडण्याचे प्रकार वाढू लागले. यातूनच मालमत्तेचे नुकसान होवून सिनेमातील खऱ्या हिरो, व्हिलन ऐवजी स्थानिक खलनायक लोकांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणीच खरोखरच्या हाणामाऱ्या होवू लागल्या व शांत असणारी वाई अशांत होवून निर्माते दिग्दर्शकांनी वाईतला मुक्काम हलवला तो परत आणलाच नाही.

याचे गांभार्य वाईकरांच्या लक्षात आले असून येथे चित्रीकरणातून मिळणाऱ्या फुकटच्या मलिद्यापायी स्थानिकांच्यात वाद लावून नुकसान करणारे, चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांना त्रास देवून सुसंस्कृत वाईला बदनाम करणाऱ्या अपप्रवृत्तींना बाजूला सारून सर्व वाईकरांनी एकत्र येवून येथील सर्वसामान्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)