वाई तालुक्‍यात वाळू माफिया मोकाट

वाई ः कृष्णा नदी पात्रात साचलेले वाळूचे ढिग. दुसर्‍या छायाचित्रात वाळू उपसा केल्यानंतर नदीपात्रात पडलेला मोठा खड्डा.

महसुल विभागाचा कारभार संशयास्पद, नागरिकांमधून संताप

वाई, दि. 13 (प्रतिनिधी) – महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे वाईच्या कृष्णा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचा राजरोसपणे बेसुमार उपसा सुरु आहे. मात्र तरीही मसहूल विभागाकडून संबंधित वाळू माफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या कारभारावरच संशय व्यक्त होऊ लागला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
वाळू माफियांकडून रात्रीच्या वेळी कृष्णा नदी पात्रात अतिशय शिस्तबध्द पद्धतीने उपसा सुरु असून याला महसूल विभागाचाही पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा नदीचे पात्र बदलण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते. वाळू माफियांकडून कृष्णा नदीच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे काम सुरु असल्याची परिस्थिती वाईत निर्माण झाली आहे.
महसूल खात्याच्या भ्रष्ट कारभारामुळे ठेकेदाराच्या संगनमताने कृष्णा नदीत बेसुमार वाळू उपसा करण्यात येत आहे. नदीच्या पात्रात मोठ-मोठाले खड्डे पडून नदीचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. नदी काठावर राहणाऱ्या लोकांच्या जीविताला यामुळे धोका निर्माण झाला आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीचा प्रवाह बदलतोय की-काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाई परिसरात भद्रेश्वर पुलापासून ते वाकेश्वरपर्यंत हा अवैध वाळू उपसा चालू आहे. काठावरच मातीमिश्रीत वाळू धुवून वाहनांमध्ये भरली जाते.
वाईच्या प्रांत व तहसीलदार हे नवीन येवूनही कारभारात काहीही फरक पडलेला नाही. हात ओले होत असल्याने त्यांच्याकडून या वाळू माफियांकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. वाई शहरातून जाणाऱ्या कृष्णा नदीला अक्षरशः वाळू माफियांनी पोखरून काढले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण सुध्दा करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक संघटना महसूल विभागाला जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.
नदीपात्रात दिवसा गाढवाच्या मदतीने तर रात्रीच्या वेळी यंत्राच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळूची चोरी महसूल खात्याच्या मेहरबानीने करण्यात येत आहे. वाई तालुक्‍यातील विविध ठिकाणी वाळूने भरलेल्या ट्रकवर कारवाई करण्याचे नाटक करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम बेधडकपणे संबंधित खात्याचे चालू आहे. पोकलेन व जेसीपी मशीनच्या सहाय्याने वाळू उपसा केल्याने धोम धरण ते ओझर्डे घाटपर्यंत नदीपात्रात जागो-जागी सात-आठ फुटांचे खड्डे तयार झाले आहेत. गतवर्षी गंगापुरी घाटावर प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केल्याने नदीपात्रात असणारा ब्रिटिशकालीन पाण्याचा डोह नामशेष होण्याच्या मार्गावर होता. तर पाण्यात माती मिसळल्याने वाईकरांना अनेक दिवस गढूळ पाणी प्यावे लागले होते.
तहसिलदार खात्याने व धोम धरणाच्या पाटबंधारे खात्याने त्वरित कारवाई करून वाळू चोर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. यात कोणाचे हात ओले झाले आहेत याचाही तपास करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. महसूल विभागाने याची गंभीर दाखल घेवून संबंधितावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरत आहे.

वाईच्या कृष्णा नदीत अनेक ठिकाणी बेसुमार वाळू उपसा केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच प्रसंग नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या वाट्याला येण्याची संबंधित खाते वाट पाहताय की काय अशी विचारणा नागरिकांमधून करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
18 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)