वाई तालुक्‍यात वणवा लावणाऱ्यांची मुजोरी वाढली

वाईच्या सह्याद्री प्रोटेक्‍टरसारख्या संस्थांकडून प्रयत्न करण्यात येत होते त्याही संस्था नागरिकांचा सहभाग व सहकार्य मिळत नसल्याने काही करु शकत नाहीत. गत वर्षी वाईतील अनेक संस्थांनी वणवा विरोधी भूमिका घेत हिरीहीरीने सहभाग घेवून वनविभागाला सहकार्य केले होते. यावर्षी मात्र वणवा लावणाऱ्यांची हिम्मत वाढली आहे.

वनविभागाचे प्रयत्न अपूर्णच,पशु पक्षांसह औषधी वनस्पती आगीच्या भक्षस्थानी

वाई -वाई तालुक्‍याला इतिहासाची वेगळी परंपरा आहे.तालुक्‍याच्या चारही बाजूने असणाऱ्या पर्वतांच्या रांगा हि या तालुक्‍याची शान आहे.परंतु या डोंगररांगाना वणवा लाऊन बोडके व काळे कुट्ट करण्याचे दुष्कृत्य विघ्नसंतोषी समाज कंटकाकडून होत असल्याने पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.वनविभागाकडून होत असलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न्‌चिन्ह निर्माण झाले आहे.

कोणत्याही चांगल्या बदलाची सुरुवात ही वाई तालुक्‍यातून होते परंतु पर्यावरणाचा नाश होणारे दुर्दैवी काम ही याच तालुक्‍यातून व्हावे हि आतिशय शरमेची आणि दुर्दैवाची बाब आहे.वनविभागाकडून ग्रामीण भागात विविध पद्धतीने पर्यावरनाविषयी जाहिरातीच्या माध्यमातून जंगल वाचवा,गैर्‌ समजुतीतून वनवा लावू नये, वनवालावल्याने जमिनीची धूप होते, वनवा लावणे कायदेशीर गुन्हा आहे.झाडे लावा झाडे जगवा या सारखी विविध प्रकारची आवाहने करूनही वणवा लावण्यापासून रोखण्यास अपयश आल्याचे चित्र दिसत आहे. वणवा हा प्रथम दर्शनी गैरसमजुतीतून लावण्यात येतो. वणव्यामुळे जंगलात व डोंगराळ भागात वास्तव्य करणारे अनेक सरपटणारे प्राणी, पशुपक्षी हे आगीत भस्मसात होत आहेत. तसेच अनेक औषधी व दुर्मिळ वृक्ष देखील गवताबरोबर आगीच्या भक्षस्थानी पडतात. पशु-पक्ष्यांमध्ये घारी, गरुड, सर्व जातीचे साप, वटवाघूळ,ससे, कळवीट, रानडुकरे, रानमांजरे, कुत्री, यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या पशु-पक्ष्यानाही आगीची झळ पोहोचते.तरी संबंधित विभागाने कर्मचारी संख्या वाढवून वणवा लागणाऱ्या प्रमुख ठिकाणी गस्त वाढवण्याची गरज आहे. खाजगी मालक स्वतः च्या बांधाला शेतातील मलमपट्टी करताना वणवा लावतात. त्याची झळ शेजारी असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्राला बसतो व त्यात अख्येच्या-अख्ये डोंगर आगीच्या भक्षस्थानी पडतात अशावेळी वनविभागाने शेजार्यावर कारवाई करण्याची गरज असून तशी मागणी वन्यप्रेमी कडून करण्यात येत आहे. वणवा लागू नये म्हणून जाळ विरोधी पट्टे अधिक रुंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.तेही काम वेळेत पूर्ण व्हावे अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

समाजातील या समाज कंटकांचे आव्हान वनविभागाला पेलणार का? हाही प्रश्न पर्यावरण प्रेमी व स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. वनविभागाने केलेल्या विविध प्रकारच्या प्रबोधनाने वणवा लावण्याचे प्रकार थांबण्याऐवजी वाढतच चालले आहेत. तसेच वानवा लावणार्यांनी एक मोठे आव्हान संबंधित विभागाला दिल्याचे दिसत आहे. तरी या विघ्नसंतोषी लोकांविरोधी संबंधित विभागाकडून कडक कारवाई करण्यात यावी. तरच पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्यात काही अंशी यश मिळेल. परंतु सध्यातरी वाई तालुक्‍यात वणवा लावणार्यांची मुजोरी वाढली आहे, असेच म्हणावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)