वाई तालुक्‍यातील मेंढपाळांचे पाण्यासाठी स्थलांतर

तालुक्‍यात काही भागात दुष्काळाची भीषणता वाढली

वाई, दि. 5 (प्रतिनिधी) – राज्यभरात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. तीच अवस्था सातारा जिल्ह्यातही आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला तरी. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे वाई तालुक्‍यातही अनेक ठिकाणी कमी पाऊस पडल्यामुळे डिसेंबर महिन्यापासूनच पाणी पातळी घटू लागली आहे. त्यामुळे याभागातील मेंढपाळांना पाण्याअभावी स्थलांतरीत व्हावे लागत आहे.

-Ads-

अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ज्या तालुक्‍याकडे पहिले जात होते तो म्हणजे वाई तालुका. या तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. वाई तालुक्‍यातील चित्र दुष्काळामुळे दिवसंदिवस भीषण होत चालले आहे. धरणातील पाणी कमी होत आहे. पूर्व भागात तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. या भागातच ओढे-जोड प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु दुष्काळ निवारण्यासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरचा वापर काही भागात करण्यात येत आहे. पण मेंढ्या पाळणाऱ्यांना त्या पाण्याचा उपयोग होत नाही. ओढे, नाले, तलाव कोरडे पडल्याने या भटकणाऱ्या प्राण्यांना पाणी पाजणे कठीण होत चालल्यानेच वाई तालुक्‍यातील मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यासह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दररोज कित्येक मेंढ्यांचे कळप पसरणी घाटातून कोकणाच्या दिशेनी जाताना दिसत आहेत.पाणी-चाऱ्यासाठी कोयनानगर परिसरात आसरा घेणार असल्याचे मेंढपाळांकडून समजले. ही अतिशय गंभीर बाब असून मुक्‍या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. वाई तालुक्‍यात असे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

वाईच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषणता जास्त पहावयास मिळते. कारण या भागात पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते. त्यात या परिसरात जलशिवरची कामेही शासनाकडून प्रभावीपणे न राबविल्याने या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भटकंती करणाऱ्याला याची मोठी झळ पोहोचते. या भागात कोणताही आधार शिल्लकच न राहिल्याने स्थलांतर केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे ओळखूनच मेंढपाळांनी स्थलांतराचा मार्ग निवडल्याचे दुर्दैवी चित्र आहे. कोयना परिसरात पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला असलातरी चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे. जर जनावरांसाठी शासन छावण्या उभारणार असेल तर त्यावेळी शेळ्या-मेंढ्याचाही विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)