वाई ग्रामीण रुग्णालयाची परवड थांबता-थांबेना

वाई ः डॉक्‍टर नसलेले वाईचे ग्रामीण रुग्णालय.

कायमस्वरुपी डॉक्‍टर नसल्याने रुग्णांची हेळसांड , नागरिकांचा ठाळे ठोकण्याचा निर्धार
अनिल काटे
मेणवली, दि. 25 – वाई येथील तालुका ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टरांअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे वारंवार रिक्त होत असल्याने रुग्णालयची अवस्थाच सलाईनवरील रुग्णासारखी होत आहे. कायमस्वरुपी डॉक्‍टरांची नेमणूक करण्याची वारंवार मागणी होऊनही त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्षच केल्याने संतप्त नागरिकांमधून वाई ग्रामीण रुग्णालयाला टाळा ठोकण्याचा निर्धार केला आहे.
वाई रुग्णालयाच्या कारभार हाकण्यासाठी मुख्य अधीक्षक डॉक्‍टर, तीन प्रमुख डॉक्‍टरांसह 26 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. रुग्णालयात 30 बेडची व्यवस्था असून किरकोळ उपचारांसह इतर कारणाने येणाऱ्या रुग्णांची दररोजची संख्या 400 हुन अधिक आहे. त्याचबरोबर एम.एल. सी. केसेस, डिलिव्हरी व ऍक्‍सिडंट पेशंटसह जनरल पेशंटची रूग्णालयात सतत ये-जा चालू असते. गेल्या दोन वर्षांपासून एकही स्थायी वैद्यकीय अधिकारी व इतर कायमस्वरूपी सहकारी डॉक्‍टर या रुग्णालयाला मिळालेला नाही. त्यामुळे रूग्ण सेवेवर विपरीत परिणाम होवून सर्व सामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराचे कसलेही सोयीरसुतक वाई तालुक्‍यातील राजकीय पुढारी-नेत्यांना नसल्याने जनतेतूनही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एकंदरीत रुग्णालयाची सध्याची अवस्था पाहता गोरगरीब जनतेच्या आरोग्याची थट्टाच याठिकाणी सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले असून या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार? लोकप्रतिनिधी की प्रशासन? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
वाई ग्रामीण रुग्णालयात नेमणूक केलेल्या डॉक्‍टरांना काही दिवसातच पुनःश्‍च सातारला अधिग्रहन केले जात असल्याने वाई ग्रामीण रूग्णालयाचा गुंता सुटण्याऐवजी वाढतच चालल्याने सर्वसामान्य जनता वैतागली आहे. वाईला कायमचा डॉक्‍टर मिळत नसल्यामुळे दवाखाना असूनही नसल्यात जमा असल्याने लोकांना खाजगी दवाखान्यात जावे लागत असून नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कायमस्वरुपी डॉक्‍टरची नेमणूक तात्पुरतीच
वाई याठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्‍टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहेत. उपलब्ध कर्मचारीच मिळेल त्या डॉक्‍टर सहकाऱ्याला बरोबर घेऊन रुग्णालयाचा कारभार हाकत आहेत. मात्र, अनेकदा डॉक्‍टरांअभावी या कर्मचाऱ्याची रुग्णासेवा करत असताना प्रचंड दमछाक होत आहे. दरम्यान, वाई रुग्णालय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करुन कायमस्वरुपी डॉक्‍टर नेमण्याची मागणी केली आहे. परंतु, तात्पुरता डॉक्‍टर नेमूण वरिष्ठ कार्यालयानेही वाई रुग्णालयाची दिशाभूल करुन रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालविला आहे. मुख्य स्थायी वैद्यकीय अधिकारी काही महिन्यापुरतेच येत असल्याने दररोजचे कामकाज करणे अशक्‍य होत आहे. मुख्य तज्ञ डॉक्‍टर नसल्याने अनेकवेळा गंभीर प्रसंग निर्माण होवून एखादी भयंकर दुर्घटना घडून शकते. डॉक्‍टरविना काम करणाऱ्या नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना त्याचा दगाफटका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. डॉक्‍टर नसल्याने संबंधित कर्मचारी जीव मुठीत घेवून भीतीखाली कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशासन, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
आमदार मकरंद पाटील यांच्या मतदार संघात येणाऱ्या आणि विशेष म्हणजे वाई शहरात असणाऱ्या या तालुका ग्रामीण रुग्णालयाला कायम स्वरुपी डॉक्‍टर मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबता-थांबेना. वारंवार तक्रारी, लेखी निवेदने, तसेच रुग्णालयाकडून वरिष्ठ कार्यालय, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुनही कायमस्वरुपी डॉक्‍टरचा प्रश्‍न सुटत नसल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्षच केल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ निवडणुकांपुरता जनतेचा कळवळा आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना डॉक्‍टरांअभावी सुरु असलेली रुग्णांची हेळसांड आता दिसत नाही का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

तज्ञ डॉक्‍टर नसल्याने प्रसुतीच्या प्रसंगी महिलांना धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तसेच मयत व्यक्तींचे शवविच्छेदन व गुन्हेगारी घटनांमधील आरोपींचे मेडिकल चेकअपसाठी पोलिसांना भुईंज अगर सातारला धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे नातेवाईकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या येथील कार्यरत डॉक्‍टराना वारंवार सातारला अधिग्रहण करून घेतले जात असल्यामुळे कामाचा ताण आल्याने अन्य डॉक्‍टरही वाईतून काढता पाय घेवून जनतेला वाऱ्यावर सोडून जात आहे.
एक त्रस्त नातेवाईक

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)