वाई ग्रामीण उपरुग्णालयास लवकरच मंजुरीची शक्‍यता

“दैनिक प्रभात’च्या पाठपुराव्याला यश : पालकमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे सुतोवाच

मेणवली, दि. 31 (प्रतिनिधी) – गेले काही वर्षे अडचणीच्या भोवऱ्यात सापडलेल्या वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या चांगल्या आरोग्यासाठी शासनाच्या आरोग्य
मंत्रालयाकडून वाई शहरात लवकरच सर्वसोयींनीयुक्त उपरुग्णालयास मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. नुकत्याच वाई तालुका भेटी दरम्यान पालकमंत्री विजय शिवतारे व राज्य बांधकाम व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपरुग्णालयास मंजुरीचे सूतोवाच केले आहे.

यावेळी डॉ. विठ्ठल भोईटे व डॉ. सतीश बाबर उपस्थित होते. पालकमंत्री व आरोग्य मंत्र्यांच्या शिफारशीमुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्‍यासाठी उप जिल्हा रुग्णालय मंजुरीची शाश्वती पक्की झाली असल्याच्या खात्रीशीर वृत्ताने तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांची वाईकर जनतेची अडचण दूर होणार आहे. जवळपास शंभर ते दिडशे बेड असलेले सुसज्ज उपरुग्णालय वाईकरांना चांगली सेवा मिळण्यास सज्ज होणार आहे. उपरुग्णालयात आधुनिक एक्‍स रे मशीन, सी. टी. स्कॅन मशीन, एम.आर.आय. सेंटर, सर्वरोग निदान लॅब, ब्लड बॅंक व अन्य महत्वाच्या बाबींसह दिमतीला विविध आजारावरील तज्ञ डॉक्‍टरांची टीम रुग्णांच्या सेवेला तैनात राहील.

वाई तालुकाच्या ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय डॉक्‍टरांची पदे वारंवार रिक्त होवून कित्येक महिने कायम गॅसवर असणाऱ्या वाईच्या ग्रामीण रूग्णालयाला उपरुग्णालयाचा दर्जा प्राप्त होवून तालुक्‍यातील गोरगरीब ग्रामीण जनतेला मोठ्या आजारावरील उपचाराची लवकरच सोय उपलब्ध होणार आहे. या निमित्ताने वाई ग्रामीण रुग्णालयात दरवेळी नेमणूक केलेल्या डॉक्‍टरांना काही दिवसातच पुनःश्‍च सातारला अधिग्रहण प्रक्रियेमुळे वाई ग्रामीण रूग्णालयाचा प्रत्येकवेळी वाढणारा गुंता सुटण्यास मदत होणार आहे. वाई रूग्णालय प्रशासनाने शासन दरबारी अनेकवेळा केलेल्या पत्र व्यवहाराला यश आले असून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नवीन रुग्णालय उपकेंद्रासाठी लागणाऱ्या जागेचाही प्रश्न काहीअंशी निकालात काढला आहे. लवकरच त्याची मुहूर्तमेढ रोवली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. जनतेचे आरोग्य हित व वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता वाईमध्ये उपरुग्णालय असणे अत्यंत गरजेचे होते.

यापूर्वी उपरुग्णालयासाठी शासकीय निधी उपलब्ध होऊनही जागेअभावी अडचण निर्माण होत होती. त्यादृष्टीने वाईच्या उपरुग्णालयास तात्काळ मंजुरीकामी आवश्‍यक त्या परवानगी देण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी दोन पावले पुढे टाकली आहेत. त्यामुळे साहजिकच येत्या काही दिवसांत वाई शहरात जिल्हा उपरुग्णालय लवकरच उभारले जाणार एवढे नक्की. दैनिक प्रभातने गेले काही दिवस सातत्याने वाईकर जनतेच्या माध्यमातून वाई ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या अडचणींचा पाठपुरावा केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)