विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान, पास असूनही आर्थिक भुर्दंड
आनेवाडी, दि. 11 (वार्ताहर) – वाईहून सातारला येणाऱ्या एसटीबसेस पाचवडपासून पुढील थांब्यांवर थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसाय होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित एसटी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना सातारासारख्या शहरात जावे लागत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटी आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी एसटीचा मासिक पासही काढला आहे. मात्र एसटीच थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाईहून साताऱ्याकडे येणाऱ्या लोकल बसेस पाचवडपासून पुढे असलेल्या उडतारे, विरमाडे, आनेवाडी, रायगाव, लिंब, नागेवाडी याठिकाणच्या प्रवाशांना ठेंगा दाखवून तशाच पुढे जात आहेत. वाहकदेखील बेल मारत नाहीत आणि चालक तर मोकळ्या गाड्या दामटण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सोसावा लागत आहे.
कारवाईची मागणी
सकाळच्या सत्रात नऊनंतर दुपारी 1 वाजेपर्यंतच्या वेळात वाईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस पाचवडपासूनच्या पुढील अनेक थांब्यांवर थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जे चालक एसटीबसेस थांबवत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)