वाई आगाराच्या एसटीचा चौथ्यांदा तुटला दरवाजा

विद्यार्थ्यांसह प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण, एसटी प्रशासनाला राहिले नाही गांभीर्य

ओझर्डे, दि. 31 (वार्ताहर) – प्रवाशांनी खचाखच भरलेल्या वाई-वाठार या एसटीचा दरवाजा बसस्थानकातच तुटला. यावेळी दरवाजाजवळ उभे असलेले विद्यार्थी एसटीतून खाली पडले. सुदैवाने ही घटना एसटी बसस्थानकातच उभी असताना घडल्याने अनर्थ टळला. दरम्यान, वाई-वाठार या एसटीचा दरवाजा तुटण्याची ही तब्बल चौथी वेळ आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वारंवार अशा घटना घडत असतानाही एसटी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने वाई आगाराकडून एकप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळच सुरु असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

वाईहून वाठारला जाणाऱ्या एसटीला नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. ही एसटी वाई ते वाठारदरम्यान सुमारे 16 ठिकाणी थांबते. विशेषत: या एसटीला विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतरच्या कालावधीत सुटणारी वाई-वाठार ही एसटी प्रवाशांनी अक्षरश: खचाखच भरलेली असते. गुरुवारीही दुपारी दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान सुटणारी वाई-वाठार ही एसटी विद्यार्थी, प्रवाशांनी खचाखच भरली होती. एसटी बसस्थानकातून सुटण्याच्यावेळी चालकाने एसटी सुरु केली आणि अचानक एसटीचा दरवाजा तुटला. यावेळी दरवाजाजवळ उभे असणारे प्रवासी, विद्यार्थी दरवाजासोबत खाली पडले. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने ही घटना बसस्थानकातच घडली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. विशेष म्हणजे वाई-वाठार या एसटीचा दरवाजा तुटण्याची ही चौथी ते पाचवी वेळ आहे. वारंवार दरवाजा तुटण्याची घटना घडत असतानाही आगार व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

प्रवाशांचा जीव घ्यायचा आहे का?
गेल्या वर्षभरात वाई आगाराच्या वाई-वाठार एसटीचा दरवाजा तब्बल चार वेळा तुटल्याची घटना घडली आहे. गुरुवारीही वाई-वाठार ही एसटी प्रवाशांनी खचाखच भरलेली असतानाच एसटीचा दरवाजा तुटल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना स्थानकातच घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र वारंवार अशा घटना घडत असतानाही एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षितेविषयी कसलीही काळजी घेतली जात नाही. याउलट अशा घटनांकडे एसटी प्रशासनाकडून दुर्लक्षच होत असल्याने एसटी प्रशासनाला प्रवाशांचा जीवच घ्यायचा आहे का? असा संतप्त सवाल होऊ लागला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)