वाईत शिवाजी उद्यानातील खेळण्यांना घरघर

वाई ः शिवाजी उद्यानातील लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेल्या खेळण्यांची दुरवस्था.

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलांचा जीव टांगणीला
वाई, दि. 5 (प्रतिनिधी) – वाई शहरातील सोनगिरवाडी येथील उद्यानाला आलेल्या बकाल अवस्थेमुळे याठिकाणी तळीरामांचा अड्डा झाला आहे तर महागणपती पुलाजवळील नाना-नानी पार्कचेही काम अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील एकमेव शिवाजी उद्यानात ज्येष्ठ नागरिकांची तसेल चिमुकल्यांची गर्दी होत असते. मात्र, या उद्यानात असलेली खेळणीदेखील दुरुस्तीअभावी शेवटच्या घटका मोजत आहेत. मोडकळीस आलेल्या खेळण्यांमुळे मुलांचा जीव टांगणीला लागला असूनही पालिका प्रशासनाकडून या खेळण्यांच्या दुरुस्तीसाठी तसदी घेतली जात नसल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरात एकमेव शिवाजी उद्यान सुस्थितीत असल्याने याठिकाणी शहरातील लहान मुलांची खेळण्यासाठी तर जेष्ठ नागरिकांची पाय मोकळे करण्यासाठी गर्दी होत आहे. गर्दीच्या मानाने या ठिकाणी असणाऱ्या सोयी-सुविधा अपूर्ण पडत आहेत. याठिकाणी असणाऱ्या खेळण्यावर त्याचा फारच मोठा भार पडताना दिसत आहे. त्यामुळे शिवाजी उद्यानातील खेळण्यांची अवस्था मोडकळीस येवून शेवटच्या घटका मोजत आहेत. मोडलेल्या खेळण्यांमुळे मुलांना इजा होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी खेळणी काथ्याच्या सहाय्याने बांधण्यात आली आहेत. तर काही खेळण्यांना काठीचा आधार दिला आहे.
एकच उद्यान असल्याने याठिकाणी गर्दी होत असल्याने ज्येष्ठ नागरिक पाय मोकळे करण्यासाठी पसरणी घाटाचा आधार घेत आहेत. मात्र, पसरणी घाट वाहनांच्या वर्दळीमुळे धोकादायक ठरु लागला आहे. केवळ पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील उद्यान, नाना-नानी पार्कचा उपभोग घेता येत नसल्यामुळे पालिका प्रशासन व ठेकेदाराबाबत वाईकर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पालिकेने या उद्यानाच्या उभारणीसाठी लाखो रुपये खर्च केला आहे, हा केलेले खर्च पूर्णपणे वाया गेल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांसाठी शहरात एकमेव शिवाजी उद्यान राहिले असून या उद्यानातील खेळण्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्काळ याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्यानातील खेळण्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)