वाईत अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोजर

मंडईतील अतिक्रमणे काढताना तणाव, बुधवारी वाई बंदचा व्यापाऱ्यांचा इशारा
वाई, दि. 27 (प्रतिनिधी) – वाईत पालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली. मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी पोलिस बंदोबस्तात म. फुले भाजी मंडईतील अतिक्रमणे जेसीपीच्या सहाय्याने पाडली. अतिक्रमण हटाव मोहिमेला व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी विरोध दर्शविल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र कोणालाही न जुमानता पोळ यानी कारवाई सुरूच ठेवली. दुपारपर्यंत वीसहुन अधिक अतिक्रमणे पाडण्यात आली. बुधवारी किसनवीर चौक, स्टेट बॅंक, बसस्थान, सेंट थॉमस, पीडब्लुडी, कचेरी व पोस्ट ऑफिस परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. दरम्यान पालिकेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापाऱ्यांनी बुधवारी वाई बंदचा इशारा दिला आहे. तसेच शिवसेनेने अतिक्रमण मोहिमेला पाठिंबा दिल्याने या मोहिमेला आता राजकीय रंग येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजता मुख्याधिकारी पोळ मंडईतील अतिक्रमणे काढण्यासाठी जेसीबी, पोलीस बंदोबस्तात पोहचल्या. मुख्याधिकारी पोळ अचानक लवा-जम्यासह आल्याने व्यापारी व भाजी विक्रेत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्ष अतिक्रमण काढायला सुरूवात झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्याशी हुज्जत घालत मोहिमेला विरोध दर्शवला. मात्र, कोणालाही न जुमानता दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकांनाबाहेर उभारलेली पत्र्याची शेड पाडण्यात आली. सुमारे वीसहुन अधिक दुकानांबाहेर अतिक्रमणे या कारवाईत काढण्यात आली. कसलीही पूर्वसुचना न देता कारवाई केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला तर दहा दिवसापूर्वीच अतिक्रमणे काढण्याची सुचना आपण स्वतः दिल्या असल्याचे पोळ यांनी सांगितले. रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे अधिकार मला आहेत. त्यासाठी पूर्व सुचना देण्याची गरज नसते असे त्या म्हणाल्या. दरम्यान पत्रकारांशी बोलताना पोळ म्हणाल्या, मंडईतील काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमणासंदर्भात तक्रार केली होती. शिवाय नगराध्यक्षांनीही अतिक्रमणासंबंधी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. या दोन्ही बाबीचा विचार करून अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे.

विक्रेत्यांसह आरपीआयचा ठिय्या
मंडईतील व्यापारी व काही भाजी विक्रेत्यांनी आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळीही काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अतिक्रमण मोहिमेच्या निषेधार्थ बुधवारी वाई बंदचा इशारा व्यापाऱ्याच्यावतीने गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, अशोक गायकवाड यांनी पोळ यांना कारवाई चुकीची असल्याचे सांगत कारवाई थांबवण्याची विनंती केली. मात्र कारवाई योग्यच असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगुन सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी युसुफ बागवान, संतोष जमदाडे व इतर महिला व्यापाऱ्यांनी पोळ याच्याशी हुज्जत घातली. बागवान यांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

अतिक्रमणात भेदभाव नाही
पालिकेकडून सर्वसामान्य व्यापारी, विक्रेत्यांवरच अतिक्रमणाची कारवाई झाली आहे. याशिवायही शहरात अतिक्रमणे आहेत. मात्र, पालिकेकडून त्यांना झुकते माप दिले जात. अतिक्रमणाच्या कारवाईत पालिकेकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप आरपीआयचे अशोक गायकवाड यांनी केला. यावेळी गरीब-श्रीमंत असा भेद न करता कारवाई केली आहे. आणि यापुढेही कारवाई अशीच चालू राहणार आहे. या कारवाईत भाजी विक्रेत्यांना उठवलं गेले नाही. केवळ अतिक्रमणे हटविली आहेत, असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी पोळ यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)