Video : वाईच्या महागणपतीचा आज वाढदिवस…

वाईचा महागणपती फक्त वाईचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत

वाई : केवळ वाईच नव्हे तरे जिल्ह्याचे लाडके दैवत म्हणून वाईचा महागणपतीचा उल्लेख केला जातो. अगदी पाचगणी-महाबळेश्‍वरला येणारे पर्यटकही महागणपतीचे दर्शन घेतल्याखेरिज माघारी परतत नाही. या लाडक्‍या बाप्पाचा आज शुक्रवार, 27 रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त वाईसह संपूर्ण शहरात लगबग सुरु झाली आहे. नदीपरिसर रोषणाईने उजळून निघला आहे. बाप्पांच्या सेवेसाठी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच धावपळ करत असल्याचे चित्र गुरुवारी गणपती घाटावर पहावयास मिळत होते.

पुरातनकाळापासून संस्कृतीचे केंद्र राहिलेल्या वाईतील मंदिरे व कृष्णा नदी काठावरील घाट वाईचे वैभव आहे. साताऱ्यातील सावकार भिकाजी रास्ते (नाईक) यांनी बाळाजी बाजीरावास आपली मुलगी गोपीकाबाई दिली आणि रास्ते घराण्याचे पेशवे दरबारी वजन वाढले. त्यामुळे रास्ते हे उत्तर पेशवाईत वाईत स्थाईक झाले आणि जवळ-जवळ अनभिशिक्त राजे बनले. त्यांनी वाईचा सर्वांगीण विकास केला.

रास्ते व त्यांचे आश्रित यांनी कृष्णाकाठावर अनेक फरसबंद घाट बांधले. उमा-महेश्‍वर (पंचायतन), महागणपती, काशिविश्‍वेश्‍वर, गोविंद-रामेश्‍वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्‍वर, केदारेश्‍वर इत्यादी सुरेख मंदिरे उभारली. वाडे बांधले आणि किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधुन बागायतीस उत्तेजन दिले व पिण्याच्या पाण्याची योजना राबविली. पेशव्यांचे सरदार गणपराव भिकाजी रास्ते यांनी 1762 च्या सुमारास कृष्णा नदीच्या दक्षिण तीरावर महागणपतीचे अभूतपूर्व मंदिर बांधले. नदीपात्राला लागून असल्याने दरवर्षी या मंदिरात पुराचे पाणी येते. जणू कृष्णामाई गणपतीला भेटायला आतुरतेने मंदिरात शिरते, असेच काहीसे हे दृष्य असते.

महागणपतीची स्थापना 1762 रोजी करण्यात आली. दक्षिण महाराष्ट्रात गणेशाची एवढी विशाल मूर्ती फक्त वाईमध्ये आहे. ही मूर्ती एकसंघ काळ्या दगडात कोरली असून कर्नाटकातून आणलेला हा नितळ दगड ब्लॅकबेसॉल्ट आहे. वाईतील महागणपती मंदिर हे राज्यात सुप्रसिध्द आहे. मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्‍चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो व मंदिर सुरक्षित राहते.

गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी सुमारे 7 फूट उंच व 6 फूट रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीचे रुप बाळसेदार असल्याने त्याला ढोल्या गणपती असे नाव प्राप्त झाले असावे. हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती 3 मीटर 63 सेमी इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल.

चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तु शास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून ती त्यात बसविली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची 24 मीटर आहे.

नदीला येणाऱ्या महापुराच्या पाण्याचा प्रचंड प्रवाहाचा तीव्र वेग पाहता गेल्या 256 हून अधिक काळ सातत्याने हे मंदिर उभे आहे याचे आश्‍चर्य वाटते. त्यावेळीच्या स्थापत्यकलेचा हे मंदिर एक विलक्षण नमुना आहे. महाकाय मूर्ती सामावून घेणारा भव्य गाभारा, विशाल सभामंडप, उंच डौलदार कळस, देखणी व सुंदर मंदिररचना ही वैशिष्टये डोळयात भरतात.

वाई हे दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द आहे. या दक्षिण काशीचे खरे वैभव असणारे हे ऐतिहासिक मंदिर वाईची वेगळी ओळख निर्माण करीत असते. नुकतेच ट्रस्टने सुमारे तीस लाख रुपये खर्च करून मंदिराचे व शिखराचे जिर्णोध्दाराचे काम पुर्वीच्या पध्दतीने चुन्यामध्ये केल्याने मंदिरास पुर्वीचे वैभव प्राप्त झाले आहे.

शुक्रवारी सकाळी नित्यपूजा, महाअभिषेक, होमहवन, सहस्त्रावर्तन, अथर्वशिर्षपठण होणार आहे. दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून सायंकाळी 5 ते 9 सौ. स्नेहा मराठे व सहकाऱ्यांचा भाव-भक्तिगितांचा कार्यक्रम होणार आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवस्थानचे ट्रस्टी विश्‍वास गोखले, उल्हास पेठे, शैलेंद्र गोखले यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)