वांबोरी चारीत नवीन पाझर तलावांचा समावेश करणार

राहुरी – वांबोरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वांबोरी चारीत नवीन पाझर तलावांचा समावेश करणार आहे. ससे-गांधले वस्ती पिण्याची पाणी योजना, बंद पडलेली वांबोरी शासकीय उपसा सिंचन योजना दुरूस्त करून ती चालू करण्यासाठी लोकप्रतिनिधींमार्फत शासन दरबारी पाठपुरावा करू. योजना पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असून, वांबोरीसाठी आगामी काळासाठीच्या मूलभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे ज्येष्ठ नेते ऍड. सुभाष पाटील यांनी सांगितले.
राहुरी तालुक्‍यातील वांबोरीसह परिसरात गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद ज्येष्ठ सदस्य ऍड. सुभाष पाटील यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे अनेक विकासाची कामे झाली. त्यामुळे गावचा कायापालट झाला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावातील समस्या जाणून घेण्यासाठी, तसेच आगामी नवीन वर्षात या सर्व समस्या दूर करण्यासाठीची भरीव चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहविचार बैठकीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ऍड. पाटील बोलत होते. बैठकीदरम्यान दत्तात्रेय गांधले यांनी ससे-गांधले वस्तीवर पिण्याच्या पाण्याची समस्या सांगितली.

त्यावर ऍड. पाटील म्हणाले की, ही समस्या दूर झाली असे समजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची तारीख तुम्ही मला सांगा; त्याच दिवशी काम सुरू करू, असे पाटील म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव करून नेत्यांच्या काम करण्याच्या पध्दतीचे स्वागत केले. पाटील म्हणाले की, पांढरीपूल ते वांबोरी मार्गे विळद-पुणे बायपास हा रस्ता तयार झाल्यास शेंडी बायपासला प्रभावी पर्याय उपलब्ध होईल. तसेच वांबोरीला विशेष महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे हा रस्ता तयार करण्यासाठी तालुक्‍याचे आमदार कर्डिले यांचे लक्ष वेधून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वांबोरीतील राहिलेले सर्व पाझर तलाव व बंधारे यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वांबोरीतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 1985 साली वांबोरी शासकीय उपसा सिंचन योजना सुरू केली होती. ती सध्या बंद आहे. तिचे पुनरुज्जीवन करणार असून लवकरच पूर्ववत चालू करून शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे ऍड. पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच, राज्यातील अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचे वीज बिल हे औद्योगिक वीजबिलाच्या दराने आकारले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतींवर अतिरिक्‍त आर्थिक भार पडत आहे. ते वीज बिल घरगुती दराने आकारावे यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)