वांबोरी घाटात धबधब्यात बुडून चौघांचा मृत्यू

भरपावसात पर्यटणाचा अतिउत्साह बेतला जिवावर : एकजण बचावला

नगर – राहुरी तालुक्‍यातील वांबोरी घाट येथे पर्यटनासाठी गेलेल्या चौघांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. रात्री उशिरा पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने चौघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

शुभम अशोक मोरे (वय 19), युवराज साळुंके (वय 21), श्रीराम रेड्डी (वय 20, राहणार तिघेही केडगाव, नगर), गणेश पोपट वराळ (वय 20, रा. माळीवाडा, नगर) अशी मयत तरुणांची नावे आहेत. प्रतीक दौलतराव गायकवाड (वय 21, तारकपूर, नगर) हा तरुण या घटनेतून बचावला आहे.

याबाबत माहिती अशी की, नगर तालुक्‍यातील डोंगरगण-वांबोरी घाट येथील धबधबा पाहण्यासाठी सोमवारी पाच तरुण गेले होते. हा धबधबा दाट जंगलात असूनही पर्यटणाच्या अतिउत्साहाने हे तरुण पाणदरी येथे गेले होते. या भागात सकाळी 11 पासून संततधार पाऊस सुरू होता. यामुळे धबधब्याच्या पाण्याचा वेग कमालीचा वाढलेला होता. येथे पाण्याचा एक कुंड आहे. सर्व तरुण त्यात आंघोळीच्या उद्देशाने उतरले. या भागात पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याचा प्रवाह वाढला. यामुळे तरुणांना कुंडाबाहेर पडता आले नाही. यापैकी एकाने बुडणाऱ्या चौघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला चौघांना वाचवता आले नाही. चार तरुण वेगवान पाण्याच्या प्रवाहाने कुंडात खेचले गेले. अतिशय दाट झाडीच्या परिसरात हा धबधबा असल्याने या तरुणांना कुणाचीही मदत मिळू शकली नाही. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली असल्याची शक्‍यता वर्तवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)