विद्यापीठाची निर्णय : बी. आर. शेजवळ यांची अध्यक्षपदी निवड
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील प्रवेशामधील गोंधळ टाळण्यासाठी नवीन धोरण आखण्यात येणार असून यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये आरक्षणाचा कोटा ठरवून त्यानुसार प्रवेश देण्यात येत असतो. या प्रक्रियेत गोंधळ होत असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात येतात. या तक्रारींची दखल घेऊन विद्यापीठाने वसतिगृहातील प्रवेशासाठी निश्चित धोरण ठरविण्यासाठी माजी वसतिगृह अधिकारी बी. आर. शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
वसतिगृहांची क्षमता, नियमावली, विद्यार्थी संख्या, विद्यापीठातील विभाग, पायाभूत सुविधा या सर्व बाबी विचारात घेऊन समितीमार्फत धोरण ठरविण्यात येणार आहे. हे धोरण विद्यापीठाच्या प्रशासनासमोर मांडून त्यानंतरच त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. विद्यापीठात सध्या मुलांसाठी 8 आणि मुलींसाठी 8 अशी एकूण 16 वसतिगृहे आहेत. यात आगामी काळात आणखी दोन वसतिगृहांचा नव्याने समावेश होणार आहे. 10 वर्षांनी वसतिगृहांबाबत आराखडा तयार केला जातो. त्याचा दर 2 वर्षांनी आढावा घेतला जातो. यापुढे मात्र विद्यापीठाच्या वसतिगृहांचे नियम बदलण्यात येणार असून विभागवार कोटा निश्चित करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसह काही विद्यार्थ्यांना गेस्ट म्हणून राहण्याची परवानगी मिळते. एका खोलीत किती विद्यार्थी गेस्ट म्हणून राहतात याची माहिती विद्यापीठाकडे नसते. काही विद्यार्थी अनधिकृतपणे वसतिगृहात राहत असल्याचेही अनेकदा आढळते. आता या प्रकाराला आळा घालण्यासाठी नवीन नियमावलीही तयार करण्यात येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा